शेलूबाजार (वाशिम) : एकिकडे भूखंड, जागा बळकाविल्या जात आहेत तर दुसरीकडे काही सद्गृहस्थ चांगल्या कार्यासाठी जागा दान देत असल्याचेही आशावादी चित्र आहे. मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा केंद्रांतर्गत येणाऱ्या भूर येथील जिल्हा परिषद शाळेसमोर असलेली २५०० स्क्वे.फुट जागा दान देऊन अतुल पाटील देवळे यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला. खासगी शाळेच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेत फारशा भौतिक सुविधा उपलब्ध नसतात, अशी नेहमीच ओरड होते. मात्र, याला अपवाद ठरत अनेक जिल्हा परिषद शाळा या खासगी शाळांपेक्षाही सरस ठरत असल्याचे दिसून येते. काही सद्गृहस्थदेखील जिल्हा परिषद शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे आशावादी चित्र आहे. वनोजा केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठ गावातील काही सद्गृहस्थांनी जागा दान दिली आहे. ३१ मार्चला मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा सक्षमीकरण मेळावा पार पडला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, तहसिलदार वैशाख वाहुरवाघ, पंचायत समिती सभापती तुळसाबाई आमटे, उपसभापती सुभाष शिंदे व इतर प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत भुर येथील प्रतिष्ठित नागरिक अतुल पाटील देवळे यांनी स्व.तुकाराम देवळे यांच्या स्मरनार्थ २५०० स्क्वे.फुट जागा शाळेसाठी दान दिली. सदर जागेचा आठ- (अ) प्रमुख अतिथिंना सुपुर्द करुन एक आदर्श निर्माण केला. सदर जागा मिळविण्यासाठी मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेंद्र राऊत, राजु भगत, माजी सरपंच रमेश चौगुले, शाळा समिती अध्यक्ष संतोष खाडे, मुख्याध्यापक दादाराव राऊत, शिक्षक दीपक जायभाये, आकाश देवळे स्वयंसेवक यांनी प्रयत्न केले.वनोजा केंद्रांतर्गत माळशेलु येथे रामचंद्र जावळे यांनी सुध्दा एक हजार स्क्वे.फुट जागा शाळेला दान दिली आहे. तर याच केंद्रातील जिल्हा परिषद शाळा येडशी येथे ७ एकर शेत शाळेला दान देण्याचं प्रस्तावित आहे. हाच आदर्श तालुक्यातील इतर शाळांसाठी सद्गृहस्थांनी घेतला तर जिल्हा परिषद शाळेतही बऱ्यापैकी भौतिक सुविधा उपलब्ध होतील, यात शंका नाही.
वनोजा केंद्रातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शिक्षक, सहकारी व ग्रामस्थांच्या मदतीने शक्य तेवढ्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. याला ग्रामस्थ व शिक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. - पांडुरंग जायभाये, केंद्रप्रमुख, वनोजा