लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पोहरादेवी येथे २५ कोटींच्या निधीतून ७.५ एकरावर भव्य धार्मिक वास्तू, उद्यान व अन्य कामे साकारली जाणार आहेत. सदर विकासकामे पोहरादेवीच्या वैभवात निश्चितच भर टाकणारी ठरणार आहेत.पोहरादेवी येथे लाखो भाविक नतमस्तक होण्याकरीता येथे येत असतात. भाविकांना अत्याधुनिक सेवा, सुविधा पुरविण्यासाठी तसेच पोहरादेवीच्या वैभवात भर टाकण्यासाठी भरघोष निधीची मागणी पालकमंत्री संजय राठोड, आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ कोटींचा निधी मंजूर केला असून, यामधून पोहरादेवी येथे अत्याधुनिक ‘नंघारा’च्या (धार्मिक स्थळ) आकाराची इमारत उभी राहणार आहे. यामध्ये व्हीआयपी मंडळीसाठी कक्ष, भक्त निवास, सामान्य महिला व पुरुषांसाठी दोन वेगवेगळे हॉल, स्वच्छता प्रसाधन गृहांचा समावेश आहे. २० मिटर उंचीची तीन मजली इमारत तयार होणार आहे तसेच ओपन थिएटर, संरक्षित भिंत, फुटपाथ, उद्यान, वाहन पार्कींग व्यवस्था, पोलीस चौकीची सुविधाही राहणार आहे. निसर्ग पर्यटन केंद्र आणि भव्य धार्मिक स्थळ (नंघारा) यामुळे पोहरादेवीच्या वैभवात निश्चितच भर पडणार आहे. दरम्यान, ३ डिसेंबरला आयोजित एका धार्मिक कार्यक्रमासाठी पोहरादेवी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले असून, ते उपस्थित राहतील, असा दावा आयोजकांच्यावतीने केला जात आहे.
पोहरादेवी तिर्थस्थळाचा होतोय कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 3:14 PM