वाशिम : अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम प्रभूरामचंद्र यांचे मंदिर निर्माण होत आहे; त्याच धर्तीवर पोहरादेवी येथे (ता.मानोरा) जगद्गुरू संत सेवालाल महाराज व राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज यांचे मंदिर उभे राहणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी रविवारी (दि.१०) पोहरादेवी येथे केले. राष्ट्रसंत रामराव महाराज मंदिर पायाभरणी कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
रामराव महाराज मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. संजय राठोड होते. मंचावर केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष ना. हंसराज अहिर, बाबुसिंग महाराज, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, देविभक्त शेखर महाराज, कबीरदास महाराज, जितेंद्र महाराज, अनिल राठोड, संजय महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री राठोड म्हणाले, पोहरादेवी येथे धार्मिक, आरोग्य क्षेत्रासह शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य आहे. नगरा वास्तूसंग्रालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभे करून भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा व पोहरादेवी येथे येणाऱ्या भाविकांकरिता रस्त्याचे जाळे वीणणार, असेही ते म्हणाले. यावेळी ना. हंसराज अहिर, शेखर महाराज, चंद्रकांत ठाकरे यांसह संत, महंत व मान्यवरांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक रणजित राठोड, संचालन प्रा. कैलास चव्हाण यांनी तर आभार संजय महाराज यांनी मानले.