वाशिम: घरात दडून असलेल्या अतिशय विषारी असलेल्या मण्यार जातीच्या सापाला मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे व त्यांचे सहकारी सुबोध साठे यांनी पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. मंगरुळपीर शहरालगतच्या शहरापूर येथे सोमवारी रात्री ९.४५ वाजता हा साप पकडण्यात आला.
मंगरुळपीर शहरलगतच्या शहापूर परिसरातील एका घरात सोमवार ९ एप्रिल रोजी एक साप घरात शिरला. घरच्या मंडळीना तो साप दिसताच भितीने त्यांची गाळण उडाली. काही लोकांनी तो साप मारण्याचा प्रयत्न केला; परंतु साप घरातील अडगळीत घुसला. त्यामुळे घरच्या मंडळींनी ही माहिती सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांना भ्रमणध्वनीद्वारे सोमवार ९ एप्रिल रोजी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास दिली. मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत सापाचा शोध घेतला. त्यावेळी तो साप मण्यार जातीचा अतिशय विषारी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांचे सहकारी सर्पमित्र सुबोध साठे यांच्या मदतीने तो साप शिताफीने पकडून त्याला बरणीत बंद करीत शहरालगतच्या वाशिम मार्गावर वीज केंद्राजवळ असलेल्या जंगलात सोडून जीवदान दिले. साप पकडल्यानंतर घरातील मंडळीने सुटकेचा श्वास घेतला.