राज्यात गत महिन्यापर्यंत नियंत्रणात असलेला कोरोना विषाणू संसर्ग आता पुन्हा झपाट्याने वाढू लागला आहे. वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत असताना, वाशिम जिल्ह्यातही गेल्या आठवडाभरात अर्थात १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारीदरम्यानच्या काळात १८२ लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शण्मुगराजन यांनी कोरोना संदर्भातील नवे नियम जारी केले आहेत. त्यात सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीसह मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह पोलीस प्रशासनालाही या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याची अंमलबजावणीही पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून केली जात आहे. तथापि, काही पोलीस मात्र स्वत:च मास्क वापराबाबत उदासीन आहेत. शुक्रवारी वाशिम शहरात हे चित्र पाहायला मिळेल.
---------------
जनतेवर प्रभाव पडणार काय
जिल्ह्यात कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना प्रशासनाला देत आहेत. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून होण्यासाठी त्यांनी प्रथम स्वत:च अमलबजावणी करून जनतेसमोर आदर्श ठेवायला हवा, परंतु प्रशासकीय यंत्रणाच आदेशाचे पालन करीत नसेल, तर जनतेवर प्रभाव पडणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.