लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतात ८ मार्च १९४३ पासून जागतिक महिला दिन साजरा केला जातो. असे असले तरी महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटनांमध्ये आजही घट झालेली नाही. अल्पवयीन मुलींचे अपहरण, विनयभंग, बलात्कार, हुंड्यासाठी छळ अशा काही घटनांचा आलेख वाशिम जिल्ह्यातही चढता आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तथा महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी पोलिस प्रशासनाची भूमिका काय, यासंबंधी जागतिक महिला दिनाच्या पृष्ठभुमिवर पोलिस उपअधिक्षक मृदुला लाड यांच्याशी साधलेला हा संवाद...
जागतिक महिला दिनाचा इतिहास, महत्वासंबंधी काय सांगाल?न्यूयॉर्क (अमेरिका) येथे वस्त्रोद्योगात कार्यरत महिला कामगारांनी दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या दोन मागण्यांसाठी ८ मार्च १९०८ रोजी पुकारलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याची जाणीव ठेऊन आजच्या महिलांनी देखील आत्मनिर्भर व्हायला हवे. पोलिस प्रशासन महिलांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेच; पण महिलांनी देखील त्यांच्यावर होणाºया अन्याय, अत्याचाराचा प्रतिकार करायला सज्ज असायला हवे.
पोलिस प्रशासनाने महिला सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या?वाशिमचे जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी अभियान हाती घेण्यात आले. रात्री उशीरा परगावहून येणाºया महिलांना गरज असल्यास पोलिसांच्या वाहनाने घरापर्यंत पोहचवून देणे, निर्भया पथकामार्फत मुलींच्या छेडखानीवर नियंत्रण ठेवणे, शाळा-महाविद्यालयांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे, आदी उपक्रमांचा त्यात समावेश आहे.
महिला व मुलींना काय संदेश द्याल?मुलींनी आपला आत्मसन्मान कायम ठेवण्यासाठी कायम तत्पर असायला हवे. महिलांनीही त्यांच्यावरील अत्याचार सहन न करता, त्याविरोधात न घाबरता आवाज उठवायला हवा. पोलिस प्रशासन सदोदित त्यांच्यासोबत आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी कोणते कायदे आहेत?महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने विविध स्वरूपातील कायदे केले आहेत. त्यात प्रामुख्याने १९६१ मध्ये तयार झालेला हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगीक छळ होऊ नये, यासाठी ‘विशाखा गाईड लाईन्स’, देवदासी प्रतिबंधक कायदा, लिंग निदान प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा आदींचा समावेश आहे. महिलांना या सर्व कायद्यांसंबंधीचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे.