वाशिम : राज्य शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यानुसार गृह विभागाशी संबंधित १७ सेवांना आॅनलाईनची जोड देण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी १७ सेवा मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यानुसार अधिसूचित केलेल्या सेवांमध्ये पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र, तक्रारदारास प्रथम खबरी अहवालाची (एफआयआर)ची प्रत पुरविणे, ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पीकरचा) परवाना देणे, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना नाहरकत परवाना देणे, सभा-संमेलने, मिरवणूक, शोभायात्रा इत्यादींना परवाने देणे, विदेशी नागरिकांचे नागरिकत्वाचे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविणे, पारपत्र पडताळणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, हॉटेल, बार, इत्यादीकरिता नाहरकत प्रमाणपत्र देणे, शस्त्र परवानासाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे, कागदपत्रे साक्षांकित करणे आदी १७ सेवांचा समावेश आहे. या सेवा पोलीस दलातर्फे आॅनलाईन पुरविण्यासाठी साधारणत: एका महिन्यापूर्वी नियोजन केले होते. सदर सुविधा आॅनलाईन उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशानुसार सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व गोपनीय शाखेचे काम पाहणारे सर्व कर्मचारी यांना महाआॅनलाईनमार्फत प्रशिक्षणही दिले होते. आता या सेवेला आॅनलाईन जोड मिळाली आहे. या सुविधांमुळे कामात एकसूत्रता येईल तसेच पोलिसांचा व नागरिकांचा वेळही वाचेल, असा दावा पोलीस प्रशासनाने केला. आॅनलाईन सेवांमध्ये विलंब झाल्यास अथवा अर्ज फेटाळला गेल्यास अपील करण्याची संधी नागरिकांना देण्यात आली आहे.