यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, प्रभारी पोलीस उपाधीक्षक श्रीराम घुगे, पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे, राखीव पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस विभागाला दिवसा व रात्रीची गस्त, तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसाठी चारचाकी व दुचाकी वाहने आवश्यक असल्याने याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सादर केला होता. सदर प्रस्तावाला पालकमंत्री देसाई यांनी मंजुरी देऊन जिल्हा वार्षिक योजनेतून यासाठी १ कोटी ६० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर ‘जेम’ पोर्टलवरून ३० मोटारसायकली व १५ चारचाकी वाहनांची खरेदी करण्यात आली. या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे, त्यामुळे कोणते वाहन कोणत्या क्षेत्रात आहे, याची माहिती नियंत्रण कक्षाला होणार असून त्याआधारे एखाद्या घटनास्थळी वेळेत मदत पोहोचविणे शक्य होईल.
यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस दलाला अधिकाधिक अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांच्या ताफ्यात सामील झालेल्या वाहनांमुळे पोलीस यंत्रणा अधिक गतिमान होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.