वाशिम: भादंवी कलम ४११ प्रमाणे गुन्हा दाखल न करण्यासाठी सहकार्य करतो, असे म्हणत तक्रारदाराकडून ऑनलाईन पद्धतीने दोन हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगरूळपीर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस काॅन्स्टेबल मंगेश सुरेश गादेकर (३५) यांना २१ मार्च रोजी ताब्यात घेतले.
मंगेश गादेकर यांची नेमणूक आसेगाव पोलिस स्टेशनला असून, ते मंगरूळपीर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात संलग्न आहेत. तक्रारदाराविरूद्ध भादंवी कलम ४११ प्रमाणे गुन्हा दाखल न करण्याकरीता सहकार्य करण्यासाठी गादेकर यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली. मात्र, तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १९ मार्च रोजी तक्रार दिली.
१९ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली. तडजोडीअंती दोन हजार रुपये स्विकारण्याची तयारी आरोपीने दर्शविली. २१ मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीने आरोपीने दोन हजार रुपये स्विकारले. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीस ताब्यात घेतले असून, मंगरूळपीर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.