लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) - शिरपूर येथे नव्याने रूजु झालेल्या पोलीस निरीक्षक संजय खंदाडे यांनी रहदारीला अडचणीचे ठरणारे वाहने व हातगाडे हटविण्याची कारवाई शुकवारी केली. शिरपूर येथील बस स्थानक ते पोलीस स्टेशन रस्त्यावर नेहमीच रहदारीला अडथळे करणारे चारचाकी व दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात उभे असतात. यामध्ये काही हातगाड्यांची अधिकच भर पडली असते. त्यामुळे या मार्गावर रहदारीस अडचण निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होते. हे लक्षात घेऊन नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक संजय खंदाडे यांनी ८ मार्च रोजी मोठा पोलीस ताफा सोबत घेऊन बस स्थानक परिसरातील अस्तव्यस्त उभी असलेली चार चाकी. तीन चाकी व दुचाकी वाहने हटविण्याची कारवाई केली. पोलिसांकडून अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शिरपूरमध्ये ही कारवाई चर्चेचा विषय बनली आहे. अशी कारवाई नेहमीच सुरू राहणार का अशी चर्चा शिरपूरवासियात होत आहे.