मंगरुळपीर : गेल्या ५० वर्षाहून अधिक काळापूर्वी बांधलेल्या पोलीस निवासस्थानांची अवस्था अत्यंत वाईट झाली असतानाही त्या निवासस्थानांच्या दुरुस्तीची दखल शासन, प्रशासनाकडून घेण्यात येत नसल्याने पोलीस कर्मचा-यांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करीत या जीर्ण निवासस्थानांत वास्तव्य करावे लागत आहे. मंगरुळपीर येथील पोलीस वसाहतीमध्ये हे वास्तव पाहायला मिळत आहे.मंगरुळपीर पोलीस ठाण्याची निर्मिती करतानाच या ठिकाणी मंजूर आस्थापनेच्या संख्येनुसार पोलिसांची निवासस्थानेही उभारण्यात आली. जवळपास ३० निवासस्थाने या ठिकाणी असून, यामध्ये पोलीस निरीक्षकांसह इतर श्रेणीतील पोलिसांच्या निवासस्थानांचाही समावेश आहे; परंतु निवासस्थाने उभारल्यानंतर कित्येक वर्षे त्याची वेळोवेळी डागडुजी करण्यात आली नाही. परिणामी यातील निम्मी निवासस्थाने पडगळीस आल्याने रिकामी झाली आहेत, तर उर्वरित निवासस्थानांची तात्पुरती डागडुजी करून त्यांचा वापर करण्यात येत आहे. या निवासस्थानांवरील कवेलूंची फुटतूट झाली असून, पावसाचे पाणी त्यामधून गळत असल्याने छतावर प्लास्टिक कापडाचे आच्छादन टाकण्यात आले आहे. दारे, खिडक्यांची मोडतोड झाली आहे, तर प्रसाधनगृहांची स्थितीही अत्यंत वाईट आहे. पोलीस वसाहत परिसरात मोठमोठी झुडपेही वाढली आहेत. त्यामुळे सरपटणा-या प्राण्यांपासूनही पोलिसांच्या कुटुंबीयांना धोका आहे. अशा विपरित परिस्थितीतही पोलीस कर्मचारी परिवारासह येथे वास्तव्य करून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. एकंदर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणा-या पोलिसांचे परिवारच या निवासस्थानांत असुरक्षित असल्याचे दिसत आहे.
पोलीस निवासस्थानांची दुरवस्था, कुटुंबीयांना करावा लागतो अडचणींचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 4:06 PM