लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : संततधार पावसामुळे ‘ओव्हर फ्लो’ झालेल्या एकबुर्जी प्रकल्पाच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी होत होती. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर ही गर्दी संसर्ग वाढविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने यासंदर्भात लोकमतने २९ आॅगस्टला वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची प्रशासनाने दखल घेत ३० आॅगस्टपासून तेथे पोलीस बंदोबस्त तैनात केला.वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा तसेच जिल्ह्यातील सर्वात मोठा प्र्रकल्प म्हणून एकबुर्जीची ओळख आहे. संततधार पावसामुळे एकबुर्जी प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. सांडव्यावरून वाहत असलेल्या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी वाशिम शहरासह परिसरातील नागरिक एकच गर्दी करतात. यावर्षीची परिस्थिती थोडी वेगळी आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात कुठेही गर्दी करू नका, अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. तथापि, कोरोनाच्या काळातही एकबुर्जी प्रकल्पस्थळी नागरिकांची गर्दी होत होती. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच, पोलीस प्रशासनाने याची दखल घेत ३० आॅगस्टपासून तेथे पोलीस बंदोबस्त तैनात केला. गर्दी करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला.(प्रतिनिधी)
एकबुर्जी प्रकल्प ठिकाणी पोलीस बंदोबस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:34 AM