धनज बु. : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक गावे जोडण्यात आलेल्या धनज बु. येथील पोलीस स्थानक परिसरात पोलीस मित्रांच्या सहकार्यातून ‘नंदनवन’ फुलले आहे.
याठिकाणी सौंदर्यीकरणासह इमारतीची रंगरंगोटी करून आवारातील प्राचीन मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला असून, या कामाचे सर्वत्र काैतुक होत आहे.
धनज पोलीस स्थानकाच्या निर्मितीपासून भौतिक सुविधांचा अभाव होता. अशातच जुलै २०२०मध्ये येथे ठाणेदारपदी रुजू झालेले व सध्या ठाणेदार पदासह कारंजा उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत असलेले अनिल ठाकरे यांच्या संकल्पनेतून पोलीस स्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात पोलीस स्थानकाच्या इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली. पोलीस स्थानक आवारातील प्राचीन मंदिराचा गावकऱ्यांच्या सहकार्यातून जीर्णोध्दार करण्यात आला. यासह झाडांना संरक्षित करून विविध स्वरूपातील झाडेही लावण्यात आली. सातत्याने बंदोबस्तावर तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना खेळण्यासाठी व्हॉलिबॉल मैदान तयार करण्यात आले. पोलीस स्थानकाची संरक्षक भिंत शिकस्त झाल्यामुळे मोकाट जनावरांचा वावर वाढला होता. त्यामुळे संपूर्ण संरक्षक भिंतीला ग्रीन नेट लावण्यात आले. कर्मचाऱ्यांना नेहमी भेडसावत असलेला पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा दूर व्हावा, या उद्देशाने पोलीस स्थानकाच्या आवारात कुपनलिका खोदण्यात आली. एवढेच नव्हे; तर मोकाट जनावरांना व पशुपक्ष्यांना पिण्याचे पाणी मिळण्याकरिता हौददेखील बांधण्यात आला.
...........................
बाॅक्स :
मुलांना खेळण्यासाठी झुल्याची व्यवस्था
धनज येथील लहान मुलांना खेळण्यासाठी पोलीस स्थानक आवारातील झाडांवर झुल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय एरव्ही सदैव अंधारात राहात असलेल्या पोलीस स्थानक परिसरात ‘हॅलोजन’ लावून रोषणाई करण्यात आली आहे.
......................
बाॅक्स :
धनजमध्ये उभी झाली पोलीस मित्रांची फळी
ठाणेदार अनिल ठाकरे यांनी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पुढाकार घेण्यासह अनेक पोलीस मित्रदेखील तयार केले आहेत. त्यांना ओळखपत्र देऊ केले असून, सध्या धनजमध्ये पोलीस मित्रांची मोठी फळी उभी झाली आहे.