- नंदकिशोर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात भाजपा व शिवसेना लाेकप्रतिनिधींनी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आराेपाने आधीच जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. त्यात खासदारांच्या शिक्षण संस्थांची ईडीकडून चाैकशी झाल्याने आता आम्हीही स्वस्थ बसणार नाही, असे वातावरण शिवसेनेत दिसून येत असल्याने, राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर ईडीची चाैकशी सुरू झाल्याने भाजप कार्यकर्ते जाेमात दिसून येत आहेत.भाजपा नेते किरीट साेमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्या संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला असून, याची चाैकशी करण्याची मागणी केली हाेती. त्यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन चांगलेच वादंग झाले हाेते. किरीट साेमय्या यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्याच दिवशी खासदार भावना गवळी यांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी कुटुंबीयांनी ५०० काेटी रुपयांचा जमीन व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आराेप केला हाेता. या आराेप-प्रत्याराेपामुळे दरराेज राजकीय घडामाेडी सुरू झाल्यात. त्या आजतागायत सुरू असून, अचानक ३० ऑगस्ट राेजी खा.भावना गवळी यांच्या ५ संस्थांची चाैकशी ईडीकडून करण्यात आली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आता आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रकरणांची पाेलखाेल केल्या जाणार असल्याची चर्चा हाेत आहे. यामुळे निवडणुका नसल्या, तरी वाशिम जिल्ह्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापलेले दिसून येत आहे. यापुढे ते अधिक तीव्र हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजप व शिवसेना लाेकप्रतिनिधींमध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र जिल्ह्यात असून, इतर राजकीय पक्ष आपल्या कार्यात मग्न दिसून येत आहेत.
साेशल मीडिया शांतखासदार व आमदार यांनी भ्रष्टाचार केल्याच्या आराेपांच्या फैरी दहा दिवसांपूर्वी सुरू झाल्या हाेत्या, तेव्हा साेशल मीडियावर चांगल्याच गाजत हाेत्या, परंतु ईडीने चाैकशी केल्यानंतर साेशल मीडियावर शांतता दिसून आली. दाेन्ही राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काेणत्याच प्रकारची पाेस्ट पेस्ट केल्याचे दिसून आले नाही. या कारवाईने ‘कही खुशी कही गम’चे वातावरण दिसून आले असले, तरी इतर व्हाॅट्सॲप ग्रुप, फेसबुकवरही काेणी काॅमेन्टस केल्याचे दिसून आले नाही.
आराेप-प्रत्याराेप चाैकशीत विकास पडला मागेगत ११ दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेले राजकीय आराेप-प्रत्याराेप व आता ईडीकडून चाैकशीने राजकीय वातावरण तापल्याने विकास कार्य मागे पडले आहे. या आराेप-प्रत्याराेपात राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते गुंतल्याने विकास कामाऐवजी, नागरिकांच्या समस्या बाजूला सारल्या गेल्या आहेत. एकमेकांचे उणेदाणे काढण्यातच वेळ जात असल्याचे चित्र वाशिम येथील राजकारणात सद्यस्थितीत दिसून येत आहे.