लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) - रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याला सुरूवात होणार असून, प्रत्येक पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.नगर परिषद सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने ९ डिसेंबर २०१८ रोजी मतदान होणार आहे. १२ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज स्विकारण्याला सुरूवात होणार आहे. १२ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. २० नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. ९ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या दरम्यान मतदान आणि १० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.वाशिम जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून रिसोडकडे पाहिले जाते. गत पंचवार्षिक निवडणुकीत रिसोड नगर परिषदेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनंतराव देशमुख व तत्कालिन राकाँचे ज्येष्ठ नेते भगवानराव क्षीरसागर यांच्या आघाडीची सत्ता होती. मध्यंतरीच्या काळात भगवानराव क्षीरसागर यांनी राकाँला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. दुसरीकडे भारिप-बमसंही यावेळी निवडणुक आखाड्यात उतरत असल्याने चौरंगी, पंचरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रमुख पक्षांनी सध्यातरी स्वबळावर किंवा पक्षाच्या चिन्ह्यावर निवडणूक लढविण्याचे जाहिर केलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत समविचारी पक्षांची आघाडी होणार की प्रत्येकजण स्वबळावर लढणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तुर्तास तरी प्रत्येक पक्षाने शहरातील प्रत्येक प्रभाग पिंजून काढण्याची मोहिम युद्धस्तरावर हाती घेतली असल्याचे दिसून येत आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, भारिप-बमसं या प्रमुख पक्षांमध्ये अतितटीची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता रिसोड नगर परिषद निवडणुकीवर प्रमुख पक्षांनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते.
रिसोड नगर परिषदेत निवडणुकीने तापविले राजकीय वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 3:49 PM