अभिनेता आमीर खानच्या पानी फाउंडेशन संस्थेने सन २०१६ ते २०१९ दरम्यान सलग तीन वर्षे राज्यात वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले. राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या संस्थेने केलेली जलसंधारणाची कामे स्पर्धेत सहभागी झालेल्या हजारो गावांसाठी वरदानच ठरल्याचे दिसत आहे. त्यात कारंजा तालुक्यातील धनज बु. येथेही सन २०१७-१८च्या वॉटर कप स्पर्धेंतर्गत ८० चौरस फूट लांब-रुंद आणि १० फूट खोल, तसेच ४० चौरस फूट लांब-रुंद आणि १० फूट खोल, अशा दोन शिवार तळ्यांची कामे श्रमदानातून करण्यात आली. या कामांसाठी जेसीबी, पोकलन या मशीनचाही आधार घ्यावा लागला; परंतु महत्त्वाचा ठरला तो ग्रामस्थांचा निर्धार, पानी फाउंडेशनच्या टीमचे मार्गदर्शन आणि सहकार्य. त्यामुळेच हे दोन्ही तळे आकार घेऊ शकले. यात गतवर्षी भारतीय जैन संघटनेकडूनही जेसीबी पुरवून या तळ्यांचे आणखी खोदकाम केले. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात हे दोन्ही तळे काठोकाठ भरले आणि परिसरातील भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली.
^^^^
तीन वर्षांपासून पाणीटंचाई नियंत्रित
वॉटर कप स्पर्धेंतर्गत खोदण्यात आलेल्या शेततळ्यांमुळे धनज बु. येथे नेहमी उद्भवणारी पाणीटंचाईची समस्या २०१९नंतर आजवर जाणवली नाही. शिवाय शेतकऱ्यांना सिंचनासाठीही मोठा आधार झाला. आता यंदाच्या पावसानेही हे दोन्ही तळे काठोकाठ भरले आहेत. या तळ्यांमुळे धनज बु. परिसर आता सुजलाम, सुफलाम झाल्याचे दिसत आहे.