हंगामाचे सोंगणीचे वेळी आलेल्या अतिवृष्टीने काजळेश्वर ते पानगव्हान रोडवरील पानगव्हान गावाजवळच्या नाल्यावर असलेला पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला, तेव्हापासून त्या पुलाचे काम संबंधित विभागाकडून केले गेले नाही. आता मात्र त्याच नाल्याला शुक्रवारी आलेल्या पुराने तोच पूल अधिक क्षतीग्रस्त झाला. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण हाेत आहे.
काजळेश्वर ते पानगव्हान या गावांना जोडणारा डांबरी रस्ता सद्या तरी दुर्लक्षित आहे. या डांबरी रस्त्यावरील डांबर उखडले असून, शुक्रवारी आलेल्या पानगव्हान गावालगतच्या
नाल्याला पुरामुळे पूल उखडला. त्यामुळे काजळेश्वरचे पानगव्हान शेतशिवारात शेती करणारे शेतकरी तथा पानगव्हानचे काजळेश्वरला येणारी शाळकरी मुलं यांच्यासमोर येण्याजाण्याची समस्या निर्माण झाली आहे. क्षतीग्रस्त पुलावरून येणे-जाणे धोक्याचे झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी पो.पा. संदीप सुपनर, युवा शेतकरी डॉ. अन्ना ताठे यांनी केली आहे.