शिरपूर जैन परिसरातील मानका, भेरा, केळीसह इतर शिवाराकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची स्वातंत्र्य पूर्वीपासूनच दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याचे खडीकरण अथवा डांबरीकरण आतापर्यंत होणे गरजेचे होते. राजकीय उदासीनता अथवा प्रशासकीय अनास्थेमुळे या रस्त्याची समस्या आजही कायम आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून तर किमान फेब्रुवारी, मार्च उजाडेपर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे व पाण्याचे साम्राज्य असते. पेरणीच्या दिवसात शेतात खते, बियाणे घेऊन जाणेसुद्धा अवघड होते. तर हंगामात शेतकऱ्यांना शेतमाल घरीसुद्धा आणता येत नाही. सोयाबीनसारखे मुख्य पीकही काढणीनंतर शेतातच ठेवावे लागते. हा प्रकार प्रामुख्याने शिरपूर बाजार समिती पाठीमागून केळी, भेरा शिवाराकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर उपरोक्त कालावधीत दरवर्षी घडतो. पावसाळ्यात या पाणंद रस्त्यावर चिखल होत असल्याने शेतकऱ्यांची गुरे-ढोरे त्यामध्ये फसत असतात; मात्र तरीसुद्धा या रस्त्याची कामे करण्यासाठी प्रशासन धजावत नाही, हे फार दुर्दैवी आहे.
..................
शिरपूर उपबाजारापाठीमागून केळी शिवाराकडे शिरपूर येथील शेतकऱ्यांचा शेतात जाण्यासाठी असलेल्या पाणंद रस्त्याची पावसाळ्यात अतिशय दुरवस्था होते. याचा जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळ शेतकऱ्यांना त्रास होतो. हे संबंधित यंत्रणेने लक्षात घेऊन पाणंद रस्त्यांचा विकास करावा.
दिनकरराव देशमुख
शेतकरी शिरपूर
शिरपूर परिसरातील सगळेच पाणंद रस्ते मनरेगा अंतर्गत प्रस्तावित केले आहे. याला मान्यता मिळाल्यानंतर जसजसा निधी प्राप्त होईल, तस तसे पाणंद रस्त्यांचे काम करता येईल.
डॉ श्याम गाभणे.
जि.प. अध्यक्ष वाशिम.