केंद्र आणि राज्य शासन मोठ्या प्रमाणात पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावाला राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी कोट्यवधी रुपयाची निधी खर्च करून नागरिकांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. मात्र मानोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले सिंगडोह या गावाला जवळपास २० ते २२ वर्षाआधी तयार करण्यात आलेले जोगलदरीपासून सिंगडोह (सिंगणापूर) पर्यंतचा तीन किमीचा डांबरी रस्ता पूर्णपणे नादुरुस्त आणि कित्येक वर्षांपासून उखडून गेलेला आहे.
सिंगडोह (सिंगणापूर) या गावची लोकसंख्या अडीच ते तीन हजार असून शाळकरी मुले, महिला आणि आजारी व्यक्तींना ये-जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. रस्ता पूर्णपणे उखडून गेलेला असल्याने ऑटो, दुचाकी अथवा इतरही वाहनांनी गर्भवती महिला अथवा आजारी व्यक्तींना नेले वा आणले असता या रस्त्याने अधिकची प्रकृती बिघडण्याची दाट शक्यता वाढलेली आहे.
सिंगडोह ते जोगलदरी पक्का आणि दर्जेदार रस्ता तयार व्हावा यासाठी गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जोगलदरी फाट्यावर मंगरूळनाथ-मानोरा या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन ही दोन वर्षांपूर्वी केले होते.
जोगलदरी ते सिंगडोह ह्या तीन कि.मी. रस्त्यावरील एक किमी डांबरी रस्त्याचे चे काम जून २०२० मध्ये करण्यात आला हाेता. तो नवा रस्तासुद्धा बांधल्या बरोबर काही दिवसातच मोठ्या प्रमाणात उखडून गेलेला आहे. जोगलदरी फाटा ते सिंगडोहदरम्यानच्या डांबरी रस्त्याचे काम मंजूर झाले असून पुढील काही दिवसातच दर्जेदार आणि मजबूत रस्त्याची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सार्वजिनक बांधकाम विभागाचे अभियंता मालाणी यांनी सांगितले.