लोकमत न्यूज नेटवर्कसाखरडोह : मानोरा तालुक्यातील साखरडोह येथे शौचालय व घरकुल बांधकामाची पाहणी करण्याकरिता आलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व चमूला काही घरांची पाहणी करून रद्द करण्याची वेळ १४ जून रोजी आली. गावात वीज पुरवठाच नसल्याने बॅटरीच्या प्रकाशात काही बांधकामांची पाहणी करून अधिकारी व चमूंनी कार्यक्रम आटोपता घेतला.साखरडोह येथे १४ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व त्यांच्यासोबत जि.प.चे काळे, मानोरा पंचायत समिती गटविकास अधिकारी गुलाबराव राठोड, स्वच्छता विभाग अभिजीत दुधाटे ,सरपंच गणेश भोयर, सचिव आर.आर.शिंदे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.येथे ३५ पैकी ३० घरकुल पूर्ण झाले आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागामध्ये असणारी विद्युत पुरवठ्याची अडचण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीदरम्यान जाणवली. अंधारामध्ये व मोबाइल टॉर्चमध्येच त्यांनी घरकुल व शौचालयाची पाहणी केली. विद्युत पुरवठ्याअभावी ग्रामीण भागातील जनतेला होणारा त्रास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनासुद्धा झाला. पाहणी न करता त्यांनी घरकुल बांधकाम लाभार्थ्यांशी चर्चा करून अडचणी, समस्या याची माहिती घेतली. त्याचसोबत वृक्ष लागवड याचीसुद्धा माहिती घेतली, तसेच नागरिकांनी आणखी शौचालय बांधून त्यांचा वापर करावा व गाव हगणदरीमुक्त करून गाव स्वच्छ व निर्मल करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे गावामध्ये शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट किती व किती शौचालयाचे बांधकाम चालू आहेत, याची माहिती घेतली. जवळपास ६० शौचालयाचे बांधकाम झाले असून, अनुदानासाठी प्रस्ताव टाकल्याची माहिती सचिव शिंदे यांनी दिली. त्यांच्यासोबत कैलास जैस्वाल, जनार्धन आगुलदरे, दत्ता भगत, अरुण बेलखेडे, घरकुल लाभार्थी, ग्रा.पं.चे कर्मचारी संजय भगत व गावातील नागरिक उपस्थित होते. मोजक्याच घरकुलांची झाली पाहणीसाखरडोह येथे जवळपास ३० घरकुल बांधकामांची पाहणी व शौचालयाची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी व चमुंना करायची होती; परंतु विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांनी आपला पाहणी दौरा रद्द केला व पाहणी थांबवली.
विजेअभावी शौचालय, घरकुल बांधकामांची पाहणी रद्द!
By admin | Published: June 17, 2017 12:41 AM