- गजानन गंगावणेलोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ : ‘गाव करी ते राव न करी’ याची प्रचिती वाशिम तालुक्यातील शेलु बु. येथे येत आहे. गावातील सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांवर गावातच उपचार मिळावे या उद्देशातून शेलु बु. येथील सैनिक (जवान) एकवटले असून, कोरोनाबाधितांवरील उपचाराचा सर्व खर्च त्यांनी उचलला आहे. एवढेच नव्हे तर आवश्यक ती औषधेदेखील उपलब्ध करून दिली आहे.सध्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ येत आहे. ही परिस्थिती पाहून गावातील रुग्णांवर पहिल्याच टप्प्यातच योग्य उपचार मिळावे यासाठी शेलु. बु. येथील सर्व सैनिक एकवटले असून, त्यांनी उपचार व औषधीचा खर्चही उचलला आहे. लवकर निदान व उपचारामुळे रुग्ण लवकर बरा होऊ शकतो, हे यापूर्वी अनेकवेळा सिद्ध झाले आहे. त्यामुळे सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी गावातच आरोग्य उपकेंद्रात सुविधा उपलब्ध केली आहे. गावातील आठ सैनिक, इतर अधिकारी, सरपंच यांनी समन्वयातून कोरोना रुग्णांबरोबरच इतर रुग्णांनादेखील गावातच मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी एका खासगी डॉक्टरची सेवा घेण्यात येत आहे. दिमतीला आरोग्य कर्मचारीदेखील आहेत. सैनिक असलेले देवानंद गुट्टे, भागवत दमगीर, पंडित तडसे, अनिल उमाळे, राजू तडसे, विठ्ठल ठाकरे, अजय गावंडे, करण कदम, गजानन ठाकरे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे, सरपंच तूषणा देवानंद गुट्टे आदींनी पुढाकार घेत कोरोना रुग्णांना मानसिक व आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न चालविला आहे. गावातील डॉ. श्याम रेखडे यांच्यासह आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी हे रुग्णांवर देखरेख ठेवून आहेत. सध्या दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनसह आवश्यक त्या औषधांचा खर्चही सैनिकांनी उचलला आहे. गावात औषधांचा साठादेखील उपलब्ध करून दिला आहे.
कोरोना संकट काळात आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याची हीच वेळ आहे, या उद्देशाने प्रेरित होऊन शेलू बु. येथील सैनिकांनी व इतर प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी लोकसहभागातून गावातील रुग्णांना गावातच मोफत उपचाराची सुविधा करून देण्याचे कार्य करण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य समजतो. देशाची सेवा करीत असताना जन्मभूमीचे ऋण फेडण्याची संधी मिळाली.-देवानंद गूट्टे, सैनिक शेलु बु.