तालुक्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या पूस नदीला मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जवळा येथील पाझर तलाव फुटल्याने २२ जुलै राेजी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सहाशे ते सातशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या इंगलवाडी गावचे ग्रामस्थ पूस नदीच्या तीरावर असलेल्या विहिरीचे पाणी मागील अनेक वर्षांपासून पिण्यासाठी वापरीत आहेत. इंगलवाडी येथील पिण्याच्या पाण्याची विहीर पूर्णपणे या पुराच्या प्रवाहात बुडालेली होती. ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असलेल्या विहिरीचे पाणी पूर प्रवाहामुळे दूषित झालेले असूनही ग्रामपंचायत प्रशासनाने त्या विहिरीचा उपसा तातडीने केला नसल्याने या पुराच्या पाण्याने पूर्णपणे दूषित झालेल्या विहिरीतील पाणी इंगलवाडी येथील नागरिक संजय रामराव राठोड यांनी पिण्यासाठी नेले असता त्यांची १६ वर्षीय मुलगी पोटाच्या वेदनेने आजारी पडली आहे.
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने दूषित पाण्यापासून नागरिकांना वाचविण्यासाठी पुराचे पाणी ओसरताच तातडीने या विहिरीतील दूषित पाण्याचा उपसा करणे गरजेचे असतांना दूषित विहिरीतच ब्लिचिंग पावडर टाकल्याने विहिरीतील जलजीव आणि मासे मरून विहीर अधिकच दूषित झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने आपली जबाबदारी झटकल्याने या गावच्या ग्रामस्थांना जलजन्य व साथीचे आजार होण्याची संभावना नाकारता येत नाही. इंगलवाडीचे ग्रामसचिव गवळी यांचेशी दूरध्वनीवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.