- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयात असलेल्या ६ पंचायत समितीपैकी ४ पंचायत समितीमध्ये महिला सभापती विराजमान होणार आहेत. यात वाशिम, कारंजा, रिसोड व मानोरा पंचायत समितीचा समावेश आहे. या ४ सभापती पदाकरिता एकूण २४ महिला दावेदार असल्या तरी मानोरा पंचायत समितीवर भाजपा, कारंजा व वाशिममध्ये महाविकास आघाडी तर रिसोडमध्ये जनविकास आघाडीची महिला सभापती होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.जिल्हयातील महिला आरक्षित असलेल्या चार पंचायत समितीवर महाविकास आघाडी, भाजपा, जनविकास आघाडी यांची सत्ता स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी उर्वरित मंगरुळपीर व मालेगाव या दोन पंचायत समिती सभापतीपदी कोणाची वर्णी लागणाार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.मंगरुळपीर पंचायत समितीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण निघाले आहे. त्यामुळे येथील सोळा सदस्य असलेल्यांपैकी सर्वाधिक सहा सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. यामुळे सभापती पद राष्टÑवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. मालेगाव येथे मात्र एकाही पक्षाकडे बहुमत नसल्याने चांगलीच कसरत होण्याची शकयता दिसून येत आहे.मालेगाव सभापती पदाकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण निघाल्याने व यासाठी इच्छुकांचीही गर्दी असल्याने सभापती कोण बनणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . मालेगाव सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही एका पक्षाला पंचायत समितीच्या १८ जागेमध्ये बहुमत नाही. राष्ट्रवादी कांग्रेसला ४, काँग्रेसला ३ जनविकास आघाडीला ४ ,वचित बहुजन आघाडीला ३ ,भाजपा ३ व १ अपक्ष अशा जागा आहे. सभापतीपदाकरिता तालुक्यात नामाप्रमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीजवळ रंजना मधुकर काळे , मरियम बी सलीम रेघीवाले आणि निर्मला विष्णू जाधव हे तीन उमेदवार आहेत तर जनविकास आघाडीकडे जयसिंगराव भिमराव घुगे, शोभा वैजनाथ आप्पा गोंडाळ , भारतीय जनता पार्टी कडे अरुण शंकरराव घुगे , लक्ष्मी गजानन व्यवहारे हे दोन उमेदवार आहेत . यामध्ये सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महिला सभापती पद ४; दावेदार २४ महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 3:29 PM