जनता व पोलीस प्रशासन यांच्यामधील दुवा म्हणून पोलीस पाटील हे कार्य करीत असतात. सोबतच विविध शासकीय कामासाठी त्यांच्या दाखल्याची गरज असते. यामध्ये प्रामुख्याने जातीच्या दाखल्यासाठी लागणारी वंशावळ तसेच रहिवासी दाखले देण्याचे महत्त्वाचे काम पोलीस पाटील यांच्याकडे असते. तसेच पोलीस स्टेशन नसलेल्या ठिकाणी गुन्हेगारी व्यक्तीचा माहितीसह घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. मात्र मागील दोन वर्षापासून शिरपूर येथील पोलीस पाटील चंद्रशेखर वानखेडे हे सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून शिरपूर येथील पोलीस पाटील पद रिक्त आहे. त्यातच नजीकच्या शेलगाव बगाडे,शेलगाव बोंदाडे,वसारी येथील पोलीस पाटील पदही रिक्तच आहे. शिरपूर येथील पोलीस पाटील पदाचा प्रभार करंजी येथील महिला पोलीस पाटील गोदावरी लहाने ह्या पाहत आहेत. त्या लोकांना जरी तत्काळ सेवा देत असल्या तरी मात्र गरजूंना शिरपूर वरून करंजी येथे दाखल्यासाठी जावे लागते. त्यामुळे गरजूंना जाण्या-येण्याचा वाहनाचा खर्चाचा भुर्दंड होत सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील पोलीस पाटलाचे पद तत्काळ भरावे अशी मागणी जोर धरत आहे.
......
दोन, तीन वर्षांपासून शिरपूर येथील पोलीस पाटील पद रिक्त आहे. प्रभार जरी करंजी येथील पोलीस पाटील यांचे कडे दिलेला आहे.मात्र शिरपूर येथील नागरिकांना दाखल्यासाठी करंजी येथे जाण्या येण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
विशाल देशमुख ,
सामाजिक कार्यकर्ते, शिरपूर जैन