इंझोरी येथील टपाल कार्यालयात शेकडो लोकांनी खाते उघडले आहे. या खात्यात ते रकमेचा नियमित भरणा करतात, शिवाय टपाल खात्याच्या विविध योजनांतही त्यांनी गुंतवणूक केली आहे. गरजेच्या वेळी रक्कम काढण्यासह खात्यातील बचतीची माहिती घेण्यासाठी खातेदारांनी कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी अनेकांच्या खात्यात रक्कमच नसल्याचे त्यांना कळले. त्यामुळे त्यांनी पोस्ट मास्तर सावळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद आला. वारंवार फोन करूनही त्यांचा फोन बंदच येत असल्याने अखेर फसवणूक झाल्याचे खातेदारांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी मुख्य टपाल कार्यालयात तक्रारी केल्या. या तक्रारीची दखल घेऊन अकोला येथील टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करण्यासाठी पथक नियुक्त केले. टपाल खात्यात कार्यरत पाच जणांचा या पथकात समावेश असून, गेल्या आठवडाभरापासून हे पथक इंझोरीच्या टपाल कार्यालयातील खात्यांची पडताळणी करीत आहे. या पथकातील एक सदस्य असलेले आर. डी. शिखरे यांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. -------- पोस्टर मास्तर फरार
इंझोरी येथील टपाल कार्यालयात विविध योजनांतर्गत बचत करणाऱ्या खातेदारांनी जमा केलेल्या रकमेची अफरातफर झाल्याचे त्यांना आढळल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यालयाकडे तक्रारी करून कारवाई करून रक्कम परत देण्याची मागणी केली. यामुळे कारवाई होण्यापूर्वीच इंझोरीचे पोस्ट मास्तर फरार झाले असून, चौकशीसाठी येणाऱ्या पथकालाही आता प्रत्येक खात्याची पडताळणी करावी लागत आहे. ---------
कोट : माझी आई गोकर्णाबाई सोनोने यांच्या इंझोरी येथील पोस्ट खात्यात जमा रकमेची अफरातफर झाल्याची माहिती मिळाली. त्यावरून चौकशी केली असता माझ्या खात्यातील ५० हजार रुपयांच्या रकमेचीही अफरातफर झाल्याचे आढळून आले. याबाबत आम्ही मानोरा येथील मुख्य पोस्ट कार्यालयात तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. -अरुण सोनोने,
खातेदार इंझोरी
--------------------------
कोट: पोस्ट खात्यात सुकन्या योजनेत दर महिन्याला पाचशे रुपयांचा भरणा करावा लागतो, मात्र मी एकाचवेळी दहा हजार रुपयांचा भरणा केला आहे. आता या रकमेची अफरातफर झाल्याचे दिसत आहे. पोस्ट मास्तरकडे चौकशी करावी तर ते कार्यालयातच येत नाहीत. सध्या काही अधिकारी येथे आठवडाभरापासून चौकशी करण्यासाठी येत आहेत.
ज्ञानेश्वर शिंदे, खातेदार, इंझोरी