वाशिम : डेल्टा प्लस व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यात २८ जूनपासून तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू होत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागही सतर्क झाला असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबरोबरच कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर राहणार आहे.
जिल्ह्यात पहिली लाट ओसरल्यानंतर साधारणत: फेब्रुवारीच्या पंधरवड्यानंतर कोरोनाची दुसरी लाट उद्भवली. मार्च ते मे या तीन महिन्यांत कोरोनामुळे जनजीवन प्रभावित झाले होते. तिसरी लाट ओसरत नाही; तोच आता डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वर्तविला जात आहे. कोरोनाचा डेल्टा प्लस हा व्हेरिएंट झपाट्याने प्रसार करणारा असल्याने दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या आहेत. जिल्ह्यात सध्या या व्हेरिएंटचा एकही रुग्ण सापडला नसला तरी खबरदारीच्या उपाययोजना सध्या आरोग्य विभागाकडून केल्या जात आहेत. झपाट्याने प्रसार होणाऱ्या या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडल्यावर मास्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे तसेच कोरोनासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सर्वच सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून कोव्हॅक्सिन तसेच कोविशिल्ड या दोन्ही लसी उपयुक्त असून जिल्ह्यात सध्या युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. नागरिकांनीही कोरोना काळात लसीचे महत्त्व ओळखून नजीकच्या केंद्रावर जाऊन कोविडची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
०००००००००००
बॉक्स
जिल्ह्यात दररोज दोन हजार चाचणी
* जिल्ह्यात सध्या नवीन रुग्ण सापडण्याची गती मंदावली आहे. मात्र धोका टळलेला नसल्याने सहाही तालुक्यांत अँटिजन व आरटीपीसीआर पद्धतीने कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.
* प्रत्येक दिवशी किमान दोन हजारांहून अधिक चाचण्या सध्या केल्या जात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
* एप्रिल, मे महिन्यांत दैनंदिन ३४०० ते ३८०० दरम्यान चाचण्या केल्या जात होत्या.
०००००००००
बॉक्स
अशी घ्यावी खबरदारी
* परराज्य, परजिल्ह्यांतून येणाऱ्या व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसून येताच तिची तातडीने कोरोना चाचणी करावी.
* घराबाहेर पडल्यावर मास्कचा वापर करावा, हात सॅनिटाईज करावेत.
* प्रत्येक पात्र व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
* कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीने कुठल्याही घरगुती किंवा अनधिकृत डॉक्टरांकडे उपचार घेऊ नयेत.
००००००
एकही कोविड सेंटर बंद नाही
* कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता, जिल्ह्यातील एकही कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले नाही.
* सरकारी रुग्णालयात बालकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली.
* आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी खासगी डॉक्टरांची मोट बांधली जात आहे.
ग्राफ
कोरोनाचे एकूण रुग्ण : ४१३४४
बरे झालेले रुग्ण : ४०४४४
उपचार घेत असलेले रुग्ण : २८२
एकूण मृत्यू : ६१७
०००००००००००
कोट बॉक्स
जिल्ह्यात सध्या या व्हेरिएंटचा एकही रुग्ण सापडला नसला तरी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीदेखील अधिक सतर्क राहून कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्याधिकारी