पावसाळा सुरू झाल्यापासून वाशिम शहरासह जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे त्रासदायक ठरू लागले आहेत. या रस्त्यांवर दुचाकी चालविताना इजा झाल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. पाटणी चौक ते अकोला नाका, हिंगोली नाका ते स्टेशन रोड, लायन्स विद्यानिकेतन ते श्रावस्तीनगर, मन्नासिंह चौक ते राजनी चौक, पुसद नाका ते मन्नासिंह चौक, मन्नासिंह चौक ते राघोबा मंदिरापर्यत, शनिमंदीर ते काळे फाईल, दंडे चौक ते दिघेवाडी, आदी रस्त्यांची स्थिती दयनीय आहे.
-----------
पुसद नाका
वाशिम शहरातील पुसद नाका हा महत्त्वाचा चौक आहे. या ठिकाणी हिंगोली, अकोला, पुसद, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांतून येणाऱ्या वाहनांची सतत वर्दळ असते. या चौकाच्या अगदी मध्यभागी कित्येक दिवसांपासून तलावसदृश खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून दुचाकीच काय, तर मोठमोठ्या वाहनचालकांनाही जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागतो. सद्य:स्थितीत या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याचे कळते. त्यांच्याकडून या रस्त्याची तात्पुरती डागडुजी होणे अपेक्षित आहे.
--------
उड्डाण पूल
शहरात निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचे रस्ते दयनीय झाले आहेत. जवळपास दोनशे मीटरच्या या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे चालक त्रस्त झाले असून, सतत ये-जा करणाऱ्या दुचाकीचालकांत पाठदुखीचा त्रास वाढल्याने ते पर्यायी मार्गाचा आधार घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तथापि, या रस्त्याची डागडुजी करण्याची तसदी घेतली जात नाही. हा मार्ग महामार्ग प्राधिकरणच्या अखत्यारीत येत असून, उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यावरच या मार्गाच्या कामाला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.
------------
वाहनखर्च व पाठदुखीही वाढली !
कोट
हिंगोली नाका ते रेल्वे स्टेशन चौकापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात दुचाकी सतत उसळून पाठदुखीचा त्रास वाढला आहे. शिवाय वाहनेही खिळखिळी होत असल्याने खर्च वाढला आहे.
- रामहरी सावके, वाहनचालक
-----------------------
कोट :
अकोला नाका ते पाटणी चौक रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. या रस्त्यावर निव्वळ खड्डेच खड्डे असून, या खड्ड्यांमुळे पाठीचा मणकाच तुटण्याची भीती वाटत असून, वाहन खिळखिळे होत असल्याने दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. नगरपालिकेने या रस्त्याची डागडुजी तत्काळ करावी.
- संतोष सरकटे,
वाहनचालक
------------
कोट :
खड्ड्यांमध्ये दुचाकीचे चाक गेल्यामुळे संपूर्ण शरीराला जोरदार झटका बसतो, विशेषत: मणक्याला. त्यामुळे मानेच्या व पाठीच्या मणक्याला इजा होऊ शकते. दोन मणक्यांमध्ये नैसर्गिक आवरणाची गादी असते. त्यातील एखादी गादी सरकली तर खूप त्रास होऊ शकतो. चालकांनी खड्डे असलेल्या मार्गावर वारंवार वाहन चालवूच नये किंवा अशा मार्गावर अगदी हळू वाहन चालवावे.
- डॉ. विवेक साबू,
अस्थिरोग तज्ज्ञ
-----
अधिकारी कोट
कोट :
शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम प्रस्तावित आहे. पावसाळा सुरू असल्याने आधी सुरू केलेली कामेही थांबवावी लागली. रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत पालिका प्रशासन आणि पदाधिकारीही गंभीर असून, पावसाळा संपताच सर्व रस्त्यांची कामे तातडीने करून सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालकांची समस्या दूर करण्यात येईल.
- दीपक मोरे,
मुख्याधिकारी, न.प., वाशिम
-------------