बाप्पांच्या आगमनात रस्त्यावरील ‘खड्ड्यां’चे विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 04:07 PM2018-09-02T16:07:19+5:302018-09-02T16:08:46+5:30
वाशिम : गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. गणेशभक्तांकडून गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असताना, दुसरीकडे प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांचा आकार मात्र वाढतच चालला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. गणेशभक्तांकडून गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असताना, दुसरीकडे प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांचा आकार मात्र वाढतच चालला आहे. गणरायांच्या आगमन मार्गावरील खड्ड्यांचे विघ्न गणेशभक्तांच्या आनंदावर काही प्रमाणात विरजन पाडण्यास कारणीभूत ठरू शकते.
१३ सप्टेंबर रोजी गणरायांचे आगमन होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते या उत्सवाच्या तयारीला लागले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गणेशभक्तांची डोकेदुखी वाढत आहे. वाशिम शहरासह जिल्ह्यात प्रत्येक शहरात गणरायांचे आगमन ही गणेशभक्तांसाठी एक पर्वणीच असते. गणरायांच्या आगमनासाठी एकिकडे गणेशभक्त सज्ज असल्याचे तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा फारशी दक्ष नसल्याचे रस्त्यांवरील खड्ड्यांवरून दिसून येते. वाशिमसह रिसोड, मालेगाव, मानोरा, कारंजा यासह प्रमुख खेड्यांतील मुख्य मार्गावरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. अद्यापपर्यंत खड्ड्यांची डागडूजी करण्यात आली नाही. शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. वाशिम शहरात मुख्य मार्गासह प्रमुख कॉलनीतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रिसोड शहरातील सिव्हिल लाईन भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांंचे साम्राज्य निर्माण झाले. तीन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून ९०० मीटर अंतर असलेला हिंगोली नाका ते कालूशा दर्गाह या दरम्यानच्या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करण्यात आले होते. काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. शहरातील रस्त्यांची पार दैना झाली आहे, अशी प्रतिक्रिया रेडीमेड कापड व्यापारी महासंघाचे प्रमुख प्रकाशराव गंजे यांनी व्यक्त केली. रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही.एम. देशमुख म्हणाले की, सिव्हिल लाईन रस्त्याच्या कामाबाबत शासनाकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठविलेला आहे. मंजूरी मिळणे बाकी आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. मालेगाव शहरातील गांधी चौक, दुर्गा चौक यासह मुख्य मार्गावर खड्डे पडले आहेत. कारंजा शहरातील बसस्टॅण्ड रस्ता यासह प्रमुख रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मानोरा शहरातील मुख्य मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने आणि खड्डे बुजविण्यासाठी ठोस उपाययोजना नसल्याने गणेशभक्तांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. जिल्ह्यातील शहरांमधील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे १० सप्टेंबरपर्यंत बुजवून गणेशभक्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.