वाशिम : सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना ‘आॅनलाईन’ पद्धतीने खत व बियाण्यांची विक्री करणे बंधनकारक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्रांना ‘पीओएस’ (पॉस) मशिन देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातील बहुतांश मशीन वापराअभावी धूळ खात पडल्या असून शासनाच्या मूळ उद्देशाला यामुळे हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने अनुदानित खतांच्या विक्रीतील गैरप्रकार टाळण्यासाठी गतवर्षीच्या खरीप हंगामापासून पॉस मशीनने शेतकºयांना अनुदानित खत वितरण करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या ‘डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर’ या योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांना मशीन वापरासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षणही देण्यात आले. मात्र, गतवर्षी देखील अनेक कृषी सेवा केंद्रांनी पॉस मशीनचा वापर न करता प्रचलित पद्धतीनेच बियाणे व खत विक्री केले. यंदाही जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये पॉस मशीन दर्शनी भागात लावल्याचे दिसत नाही. त्यामुळे अनुदानित खतविक्रीत पुन्हा एकवेळ ‘गौडबंगाल’ होण्याची शक्यता सुज्ञ शेतकºयांमधून वर्तविली जात आहे.
जिल्ह्यातील सर्वच नोंदणीकृत कृषी सेवा केंद्र संचालकांना पॉस मशीन हाताळण्यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांनी यामाध्यमातूनच अनुदानित खते व बियाण्यांची विक्री करावी. असे झाले तरच शेतकºयांचाही फायदा होईल. या प्रक्रियेकडे जिल्हा परिषदेचा कृषी विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. - नरेंद्र बारापत्रे, कृषी विकास अधिकारी, वाशिम