लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: शासनाने यंदापासून पॉस मशीनद्वारे अनुदानित खतांची विक्री करण्याचा निर्णय घेतला. या प्रकियेला १ जूनपासून सुरुवात झाली; परंतु ही मशीन हाताळण्यासाठी पुरेसे प्रशिक्षणच कृषी सेवा केंद्रधारकांना मिळाले नसल्याने. पहिल्याच दिवशी या योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील पाचही कृषी सेवाकेंद्रांवर पॉस मशीनच्या वापराअभावी अनुदानित खतांची विक्री होऊ शकली नाही. राज्य शासनाने अनुदानित खतांच्या विक्रीतील संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी यंदापासून पॉस मशीनने शेतकऱ्यांना अनुदानित खतांचे वितरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रधारकांना या मशीन वापरण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण १६ आणि २७ मे रोजी देण्यात आले. तथापि, २७ मे रोजी झालेल्या प्रशिक्षण शिबिरात तांत्रिक कारणांमुळे आलेल्या अडचणीने अनेक कृृषी सेवा केंद्रधारकांना मशीनच्या वापराचे आवश्यक तंत्र कळू शकले नाही. त्यामुळे १ जूनपासून पॉस मशीनने खत विक्री काही दुकानदारांना सुरू करता आली नाही. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे १३ पैकी पाच दुकानांत ही मशीन देण्यात आली असली. तरी संबंधित कृषी सेवा केंद्रधारकांना मशीन हाताळणे जमत नसल्याने त्यांनी १ जून रोजी अनुदानित खतांची विक्रीच केली नाही. या मशीनच्या हाताळणीसाठी आणखी योग्य प्रशिक्षण देण्याची मागणी ते करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच नोंदणीकृत कृषी सेवा केंद्रधारकांना कृषी विभागाच्यावतीने मशीन वितरित करण्यात आल्या आहेत. जवळपास ४०० कृषी सेवा केंद्रांत ही व्यवस्था असून, त्या ठिकाणी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत अनुदानित खतांची विक्री करण्यात येणार असल्याचे ठरले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हे कर्मचारी येत्या काही दिवसांत कर्मचारी कृषी सेवा केंद्रात उपस्थित होण्याची शक्यता आहे. कृषी सेवा केंद्रधारकांना मार्गदर्शनाची गरज कृषी सेवा केंद्रधारकांना अनुदानित खतांच्या विक्रीसाठी पॉस मशीन देण्यात आल्या. त्यासाठी दिलेल्या जुजबी प्रशिक्षणाच्या आधारे त्यांनी त्या मशीनचा वापर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु त्यांना ते जमले नाही. त्यामुळे त्यांनी पहिल्या दिवशी अनुदानित खतांची विक्री थांबवली आणि यासंदर्भात कृषी विकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून अधिक मार्गदर्शनाची मागणी केली. मशीनच्या वापराअभावी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लागू नये म्हणून त्यांनी रीतसर निवेदन सादर करून आपल्या अडचणी सादर केल्या, तसेच या मशीनच्या वापराचा कालावधी पुढील हंगामापर्यंत वाढविण्याची मागणीही केली आहे. या निवेदनावर मालेगाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्रधारक संघटनेतील सर्व सदस्यांची स्वाक्षरी आहे. जिल्ह्यातील सर्वच नोंदणीकृत कृषी सेवा केंद्रधारकांना १७ आणि २६ मे रोजी रीतसर प्रशिक्षण देण्यात आले आहे. ज्या लोकांनी हे प्रशिक्षण घेतले नाही किंवा ज्यांना अधिक माहितीची गरज वाटते, त्यांनी वाशिम येथील आरसीएफ क ार्यालयात जाऊन प्रशिक्षण घ्यावे आणि मशीनद्वारेच विक्री करावी. - नरेंद्र बारापत्रे, कृषी विकास अधिकारी, वाशिम.
पॉस मशीनने अनुुदानित खत विक्रीचा बोजवारा!
By admin | Published: June 02, 2017 1:14 AM