लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कधीकाळी उण्यापुर्या चार ठिकाणी वीज अवरोधक यंत्र उभारण्यात आले होते. यामुळे आकाशातून चकाकत येणार्या विजेला बहुतांशी प्रतिबंध घालणे शक्य होत होते. मात्र, आजमितीस चारही यंत्र नामशेष झाले असून, विजेला कुठेच अटकाव घालण्याची व्यवस्था नसल्याने विजेमुळे होणार्या हानीचे प्रमाण वाढल्याचे शासकीय आकडेवारीवरून सिद्ध होत आहे.वाशिम जिल्ह्यात वाशिम नगर परिषद कार्यालय, वारा जहाँगीर (ता. वाशिम), भुलोडा (ता. कारंजा लाड) आणि डव्हा (ता. मालेगाव) याठिकाणी चार वीज अटकाव केंद्र प्रस्थापित करण्यात आले होते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या यंत्रांच्या देखभाल, दुरूस्तीकडे लक्ष पुरविले गेले नसल्याने ते पूर्णत: नादुरूस्त झाले आहेत. ३१ मे रोजी वीज पडून कुरळा (ता. मालेगाव) येथील वृद्धाचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी मोरगव्हाणवाडी (ता.रिसोड) येथे दोन मजुरांचा मृत्यू झाला; तर ३ जूनला कळंबा बोडखे (ता. मंगरूळपीर) येथील महिला गंभीर जखमी झाली. याशिवाय शेकडो झाडे जमीनदोस्त झाली, काही जनावरांनाही यात प्राण गमवावा लागला आहे. तथापि, ठरावीक ठिकाणी वीज अटकाव यंत्र उभारल्या गेली असती, तर कदाचित अशा घटनांना पायबंद घालणे शक्य झाले असते, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. बंद पडलेली वीज अवरोधक यंत्र सुरू करून आवश्यक त्याठिकाणी नवीन यंत्र कार्यान्वित करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांना पत्रव्यवहार केला आहे. हा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल. - बाळासाहेब बोराडेजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वाशिम
वीज अवरोधक यंत्र नादुरुस्त
By admin | Published: June 05, 2017 2:24 AM