---------
२४१ ग्रामस्थांची कोरोना चाचणी
कामरगाव : आरोग्य विभागाने कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी गावागावात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. यात कामरगाव परिसरातील आठ ते दहा गावांत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण जाधव यांच्या मार्गदर्शनात गुरुवारपर्यंत २४१ ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात एकही व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला नाही.
^^^^^^^^^^^
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर
पोहरादेवी : मानोरा तालुका आरोग्य विभागाकडून या महिन्याच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत कुटुंब नियोजन शिबिरांचे आयोजन केने जात आहेत. यात पोहरादेवी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या विविध उपकेंद्रात १४ जानेवारीपासून हे शिबिर घेण्यात येत आहे. या अंतर्गत कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जात आहेत.
--------
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
मंगरुळपीर : येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होत आहेत. या अंतर्गत शाळांची साफसफाई करून पालकांचे संमतीपत्र घेण्याची मोहीम राबविली जात असून, या प्रक्रियेचा आढावा मंगरुळपीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष पवने यांनी शुक्रवारी घेतला. यावेळी मुख्याध्यापकांना त्यांनी काही सूचनाही दिल्या.
--------------
अनुदानित भुईमूग बियाण्यांचा तुटवडा
वाशिम : कृषी विभागाकडून यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्यासाठी कृषी विभागाने अनुदानित बियाण्यांची मागणी नोंदविल्यानुसार महाबीजने १६० क्विंटल बियाणेही उपलब्ध केले; परंतु क्षेत्र वाढल्याने आता बियाण्यांचा तुटवडा जाणवत आहे. शेतकऱ्यांना बियाणे मिळणे कठीण झाले आहे.
--------
महामार्गावर चालकांना मार्गदर्शन
मानोरा : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मानोरा पोलिसांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अभियानाला सोमवार १८ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, या अंतर्गत शुक्रवार २१ जानेवारी रोजी मानोरा पोलिसांनी अकोला-आर्णी या महामार्गावर वाहनचालकांना मार्गदर्शन करून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.