अगोदरच कोरोनाचे संकट, त्यातच गतवर्षीची नापिकी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. या संकटातून स्वत:ला सावरत धनज बु. परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, कांदा, टरबूज मका आदी पिके फुलविली आहेत. सिंचनाची सुविधा असल्याने उन्हाळी पीक चांगल्या अवस्थेत आहे. मात्र, गत सहा ते सात दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. यासंदर्भात येथील विद्युत वितरण कार्यालयाला माहिती देऊन सुद्धा खंडित झालेल्या विद्युत पुरवठा अद्याप सुरळीत करण्यात आला नाही. यामुळे उन्हाळी पिके धोक्यात सापडली असून, शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. याकडे महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी धनज बु येथील शेतकऱ्यांनी केली.
कोट
शेतात चार एकरमध्ये टरबूज आहे. परंतु गेल्या सहा दिवसांपासून शेतातील विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे टरबूज पिकासह, मका व कोथिंबीर हे पीक धोक्यात सापडले आहे. वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
- जयेश बोथरा,
शेतकरी धनज