अडाण प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या म्हसणी येथे ग्रामपंचायतकडून नळ योजनेद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे ग्रामस्थांना सहसा पाण्याची टंचाई जाणवत नाही. तथापि, गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायतने पाणीपुरवठा योजनेचे वीज देयकच अदा केले नाही. महावितरणकडून वारंवार सूचना देण्यात आल्यानंतरही ग्रामपंचायतने दखल न घेतल्याने अखेर दोन दिवसांपूर्वी येथील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावातील महिलांसह लहान मुले आणि पुरुषांची विहिरी, हातपंपांवर पाण्यासाठी झुंबड उडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
-------------------------
पातळी खालावल्याने पाणी काढणे कठीण
उन्हाळ्याच्या दिवसात म्हसणीसह परिसरातील भूजलपातळी खालावल्याने हातपंपासह विहिरीतून पाणी उपसताना महिला, पुरुषांनाही दम लागत आहे. काही मंडळी शिवारात एक किलोमीटर पायपीट करून पाणी आणत कुटुंबाची तहान भागवत आहेत. ग्रामपंचायतने पाणीपुरवठा योजनेच थकीत देयक अदा करून पाण्याची समस्या दूर करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
---------
कोट: गावातील अनेक लोकांकडे पाणीपट्टीचे देयक थकीत आहे. ग्रामपंचायतकडे पुरेसा निधी नसल्याने पाणीपुरवठा योजनेचे वीजदेयक अदा करता आले नाही. येत्या एक दोन दिवसांत वीजदेयक अदा करून गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.
-
मालाबाई नागफासे,
सरपंच
ग्रामपंचायत म्हसणी