मानोरा : गेल्या काही दिवसांपासून मानोरा परिसरात कोणत्या ना कोणत्या कारणाने वारंवार वीजपुरवठा खंडित होतो आहे. २५ मे राेजी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. धामणी परिसरात मंगळवारी रात्री १० वाजता खंडित झालेला पुरवठा बुधवारी दुपारी सुरळीत झाला.
उन्हाळा असल्याने तापमानात दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याने वारंवार खंडित हाेत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. तसेच वारंवार वीजपुरवठा काहीही कामासाठी खंडित केला जाताे. तर अनेक ठिकाणी रोहित्र नादुरुस्त आहेत, काही ठिकाणी बंद आहेत, तारा लोंबकलेल्या आहेत, झाडाच्या फांद्या तारामध्ये येत असल्याने वीजपुरवठा खंडित हाेत आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
.................
जिल्हा परिषदेच्या शाळा संस्थात्मक विलगीकरणाकरिता घोषित
मानोरा : पंचायत समितींतर्गत येत असलेल्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा कोविड १९ अंतर्गत संस्थात्मक विलगीकरणासाठी घोषित करण्यात आल्या आहेत. अशाच एका भुली येथील शाळेची पाहणी करण्यात आली. येथे पाण्याची व्यवस्था, वीज, शाैचालय आहे का, याची पाहणी करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सागर जाधव, गट शिक्षणाधिकारी अनिल पवार यांनी पाहणी करून तपासणी व लसीकरणाबाबत सूचना केल्या.
---------------------