सनत आहाळे / वाशिमपाऊस येण्याच्या वेळी आकाशात ढगांचा कडकडाट होऊन वीज पडण्याच्या अनेक घटना दरवर्षीच्या पावसाळयात घडतात. यापैकी काही घटनांमध्ये काही व्यक्ती जखमी होण्याच्या, तर प्रसंगी काही जणांचा मृत्यू होण्याच्याही घटना घडत असतात. वाशिम जिल्हय़ात मागील १0 वर्षात वीज पडून ७१ जण मृत्युमुखी पडले आहेत. वीज पडण्याला प्रतिबंध घालण्याचे काम वीजरोधक यंत्रे करतात; परंतु वाशिम जिल्हय़ात सद्य:स्थितीत केवळ चार गावांमध्येच वीजरोधक यंत्रे बसविली आहेत त्यामुळे जिल्हय़ात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. वीज पडण्याच्या घटना केवळ पावसाळय़ाच्या चार महिन्यातच होतात असे नव्हे, तर वर्षभरातील कोणत्याही महिन्यात होतात. हा सार्वत्रिक अनुभव आहे. फक्त पावसाळय़ाच्या प्रारंभी व शेवटच्या महिन्यात त्याचे प्रमाण अधिक असते. विशेषत: जून महिन्यात हे प्रमाण जास्त असते. सन २00४ पासून सन २0१३ पर्यंत मागील १0 वर्षात वीज पडण्याच्या घटनांमध्ये ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमध्ये सर्वाधिक १९ व्यक्तीचा मृत्यू जून महिन्यात वीज पडून झाला. सप्टेंबर महिन्यात १८ व्यक्तींचा, तर ऑक्टोबर महिन्यात ११ व्यक्तींचा मृत्यू झाला. जुलै महिन्यात ६, एप्रिल महिन्यात ५, ऑगस्ट महिन्यात ४, मार्च महिना व मे महिन्यात प्रत्येकी ३ तर जानेवारी व नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मागील १0 वर्षात डिसेंबर व फेब्रुवारी महिन्यात वीज पडून मृत्यू झाल्याची एकही घटना घडली नाही; परंतु याचा अर्थ या महिन्यात वीज पडण्याच्या घटना घडत नाहीत, असा नव्हे. वीज पडण्यास अटकाव करण्यासाठी वीजरोधक यंत्रे गावात बसविल्यास गावात वीज पडण्याचे टळू शकते. या दृष्टिकोनातून जिल्हय़ात प्रत्येक गावात वीजरोधक यंत्रे बसविल्यास वीज पडून होणारी मनुष्यहानी व पशुहानी बर्यापैकी टळू शकते. वाशिम जिल्हय़ात सद्य:स्थितीत वाशिम शहरात नगर पालिकेच्या आवारात वाशिम तालुक्यातील वारा जहागीर, मालेगाव तालुक्यात डव्हा येथे नाथनंगे महाराज संस्थानात व कारंजा तालुक्यात भुलोडा येथे अशा चार गावातच वीजरोधक यंत्रे बसविण्यात आलेली आहेत.
केवळ चार गावात वीजरोधक यंत्रे
By admin | Published: June 07, 2014 1:13 AM