लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पुरुषप्रधान संस्कृतीच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर नारीशक्ती वेगवेगळ्या पैलूंच्या माध्यमातून वेगवेगळया रूपात समोर येत आहे. कर्तृत्वाच्या बळावर विविध क्षेत्रांत महिलाही चमकदार कामगिरी करीत असून, सरत्या वर्षापासून महिलांनी बीजप्रक्रिया, माती परीक्षण, बांधावर खत व बियाणे पुरविण्याच्या कृषी क्षेत्रातही दमदार एन्ट्री केली आहे. ‘कोरोना’मुळे अनेक क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरत्या वर्षातील खरीप हंगामात बांधावर खत, बियाणे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम कृषी विभागाने राबविला. या उपक्रमाला जिल्ह्यात ‘उमेद’ अभियानातील कृषी सखींच्या सहकार्याची जोड देण्यात आली. जिल्ह्यात ९२ ग्रामसंघ व १७८६ समूह, १०० पेक्षा अधिक कृषी सखी आहेत. खरीप हंगामात ‘शेतकऱ्यांच्या बांधावर खत व बियाणे’ हा उपक्रम महिलांनी यशस्वी करून दाखविला. कृषी विभागातर्फे कृषी सखींना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले. बियाणे व खताच्या नोंदी घेणे, एकत्रित बियाणे व खते खरेदी करणे व त्याची कृषी विभागाने तयार केलेल्या संकेतस्थळवर नोंद करणे तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमधून माती परीक्षण नमुने घेणे, गावस्तरावर शेतकऱ्यांच्या बियाण्यांवर बीजप्रक्रिया करणे इत्यादी कार्य उमेद अभियानातील कृषी सखी, समूह व ग्रामसंघातील महिला सदस्य करीत आहेत. यापुढेही कृषी क्षेत्रातील माती परीक्षण, बीजप्रक्रिया यांसह अन्य उपक्रमांत महिलांचा सहभाग वाढविण्याचा मानस कृषी विभागाने व्यक्त केला. (प्रतिनिधी)
माती परीक्षण क्षेत्रातही महिलांची दमदार 'एन्ट्री'!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 11:05 AM