रिसोड: रिसोड पंचायत समितीच्या सभापती म्हणून भाजपाच्या छाया सुनील पाटील तर उपसभापती म्हणून शिवसेनेचे महादेव ठाकरे यांची अविरोध निवड झाली. तत्कालीन सभापती-उपसभापती यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर २५ एप्रिल रोजी ही निवडणूक घेण्यात आली.रिसोड पंचायत समिती सभापती प्रशांत खराटे व उपसभापती विनोद नरवाडे यांचेवर पंचायत समितीच्या १२ सदस्यांनी अविश्वास ठराव पारित १८ एप्रिल २०१७ रोजी केला होता. सभापती व उपसभापतींची पदे रिक्त झाल्याने, २५ एप्रिल २०१७ रोजी सभापती व उपसभापती या दोन्ही पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी भाजपाच्या छाया सुनील पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला तर उपसभापती म्हणून शिवसेनेचे महादेव ठाकरे यांचाही एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. विहित मुदतीत या दोन अर्जांव्यतिरिक्त अन्य अर्ज न आल्याने सभापती म्हणून छाया पाटील व उपसभापती म्हणून महादेव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी घोषित केले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान सभागृहामध्ये १८ पैकी १३ सदस्य उपस्थित होते. यामध्ये छाया पाटील, तत्कालीन उपसभापती विनोद नरवाडे, गजानन बाजड, शारदा आरु, कावेरी अवचार, नागोराव गव्हाळे, ज्योती मोरे, महादेव ठाकरे, यशोदा भाग्यवंत, चंद्र्रकला बांगरे, श्रीकांत कोरडे, केशव घुगे व कमल करंगे यांचा समावेश होता. गत अडीच वर्षांपूर्वीची सभापती-उपसभापतींची जोडी पुन्हा त्या-त्या पदावर विराजमान झाल्याच्या इतिहासाची नोंदही रिसोड येथे झाली आहे. यापूर्वीदेखील सभापती म्हणून छाया पाटील व उपसभापती म्हणून महादेव ठाकरे विराजमान होते.सभापती व उपसभापती यांच्या निवडीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. निवडीनंतर पंचायत समिती निवासस्थान परिसरात सभापती व उपसभापती यांचा सत्कार भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर, गोपाल पाटील राऊत, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस नितीन काळे यांनी सत्कार केला. यावेळी विष्णुपंत खाडे, सुनील बेलोकर, नंदकिशोर मगर, शालीक ढोणे, गजानन पाटील, भारिप-बमसंचे डॉ. रवींद्र मोरे पाटील, बबनराव मोरे, खुशाल ढोणे, डॉ. प्रल्हाद कोकाटे, किशोर गोमाशे, भारत नागरे, मच्छींद्र ढोणे, गुलाबराव पांढरे, सरपंच विनोद बाजड, गजानन कोकाटे, विष्णुपंत बोडखे, अमोल लोथे, अतुल थेर, बंडू पाटील, एस.पी. पल्लोड, गोपाल जाधव, शंकर दुबे, सुधीर सरकटे, समाधान घोळवे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व समर्थक हजर होते. त्यानंतर सभापती व उपसभापती यांचा खासदार भावना गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. चंद्र्रशेखर देशमुख, निवासी उपजिल्हाप्रमुख भागवत गवळी यांनी सत्कार केला. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख गजानन अवताडे यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
पं.स. सभापतीपदी पाटील; उपसभापतीपदी ठाकरे अविरोध
By admin | Published: April 26, 2017 2:43 AM