माता, बाल मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना जाहीर केली आहे. गर्भवती महिलांना सकस आहार देऊन सुदृढ बालक जन्माला यावे, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या सर्व स्तरातील पहिल्या वेळेस गरोदर राहिलेल्या महिलांना सकस
आहार घेण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. गरोदरपणाच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या मजुरीची भरपाई व्हावी, यासाठी योजनेच्या माध्यमातून ३ टप्प्यात ५००० रुपयांचे अनुदान दिले जाते. मार्च २०२० महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असतानाही जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही कसूर ठेवण्यात आली नाही. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत पहिल्यांदा गर्भवती राहणाऱ्या ५२८५ महिलांना २ कोटी ५६ लाख ७५ हजार रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळाला, तो त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला आहे. आरोग्यसेवक, सेविका, आशा स्वयंसेविका यांच्या मार्फत मातृवंदना योजनेचा प्रचार, प्रसार केला जातो. प्रथम गरोदर राहिलेल्या महिलांच्या नावाची नोंदणी, प्रसुती खासगी रुग्णालयात केली जात असून, अशा महिलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो. १२ आठवडयात गर्भवती महिलेला नजीकच्या आरोग्य केंद्रात आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्याकडे नोंदणी करावी लागते. सर्व तपासण्या केल्यानंतर लाभार्थी महिलांना त्यांच्या पतीचे आधारकार्ड, लाभार्थी यांचा राष्ट्रीयीकृत बँकेचा खाते क्रमांक, माताबाल संरक्षक कार्ड, बाळाच्या जन्म दाखल्याची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे सादर
करावी लागतात.
-----
केवळ १ टक्का लाभार्थींचे अनुदान प्रलंबित
जिल्ह्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयात मिळून सन २०१९ आणि २०२० मधील एकूण २४०८८ महिलांना मातृवंदना योजनेच्या अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. केवळ मे महिन्यानंतर दाखल झालेल्या प्रस्तावांपैकी १ टक्का लाभार्थींचे अनुदान तांत्रिक कारणांमुळे थांबले आहे. याची चौकशी करून त्यांच्या खात्यातही अनुदान जमा केले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
--------------
गर्भवती महिलांचा कोट
१) कोट : गतवर्षी जानेवारी महिन्यात मातृवंदना योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व कागदपत्रे सादर करून प्रस्ताव दाखल केला. परंतु वर्षभराचा कालावधी उलटला तरी, या योजनेचे अनुदान अद्याप मिळाले नाही.
- रेखा कांबळे,
वंचित महिला
-----------
२) कोट: मातृवंदना योजनेचा लाभ मिळावा म्हणून आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून गतवर्षी जुलै महिन्यात प्रस्ताव सादर केला. प्रसुती होऊन सहा महिने उलटले तरी आम्हाला या योजनेतून अनुदान मिळाले नाही.
- नेहा कुरेशी,
वंचित महिला
-------------
शासकीय रुग्णालयात झालेल्या प्रसुती
२०१९ - ८४४९
२०२० - ६३७६
----------
खासगी रुग्णालयात झालेल्या प्रसुती
२०१९ - ४८५६
२०२० - ४९२८
-------------
मातृवंदनाचा लाभ घेतलेल्या
महिला
२०१९ - १३३०५
२०२० -११३०४