लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर (वाशिम) : प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती जिल्ह्यातील होतकरू, गरजू बेरोजगार युवक-युवतींपर्यंत पोहोचावी, यासाठी जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समिती व नियोजन विभागामार्फत ग्रामीण भागात १२ फेब्रुवारीपासून चित्ररथाद्वारे या योजनेचा प्रचार, प्रसार करण्यात येत आहे. १७ फेब्रुवारी रोजी हा चित्ररथ शिरपूर येथे केवळ पाच मिनिटांसाठी दाखल झाला आणि आल्या पावलीच परत गेल्याचा प्रकार घडला.गरजू तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेविषयी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना माहिती मिळावी, यासाठी एलईडी व्हॅन वाहन व चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. ग्रामीण भागात जावून एलईडी व्हॅन व चित्ररथ योजनेचा प्रसार करीत आहे. काही ठिकाणी केवळ सोपस्कार पार पाडले जात असल्याचे शिरपूर येथील घटनेवरून दिसून येते. १७ फेब्रुवारी रोजी शिरपूर बसस्थानक परिसरात सदर चित्ररथ आला होता. पाच मिनिटे तेथे थांबून पुढील प्रवासासाठी चित्ररथ रवाना झाला. त्यामुळे प्रधानमंत्री मुद्रा योजनेची जनजागृती शिरपूर येथे होऊ शकली नाही. यासंदर्भात चालकाला विचारणा केली असता, जिल्हाभरात हा चित्ररथ फिरविण्यात येणार असून, शिरपूर गावातून चित्ररथ नेला जात आहे, असे सांगितले. नाव विचारले असता, नाव सांगण्यास नम्रपणे नकार दिला.
प्रधानमंत्री मुद्रा योजना; चित्ररथ आला आणि पाच मिनिटाच माघारी फिरला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 5:21 PM