मानोरा तालुक्यातील बहुतांश नागरिकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती असून मागील अनेक वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि सुलतानी संकटाला सामोरे जात आहेत. मागील वर्षापासून खते, बियाणे तथा शेतीउपयोगी औषधांच्या किमतीत भरमसाट वाढ होत असल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत.
खतांच्या किमतीत यावर्षीसुद्धा केंद्र शासनाकडून भरमसाट वाढ झाल्याने शेतकऱ्यांवरील या अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भारत माता की जय, जय जवान जय किसान, रासायनिक खतांची अन्यायकारक भाववाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, अनावश्यक डाळी आयात करून डाळ उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत नंतर तीन ते पाच मिनिटे टाळ्या व थाळ्या वाजवून आंदोलन करण्यात आले. राज्यमंत्री बच्चु कडू, ‘प्रहार’चे कार्याध्यक्ष बल्लू जवांजाळ यांच्या आदेशाने तालुका अध्यक्ष शाम पवार यांच्या नेतृवात केलेल्या या आंदोलनवेळी शाम पवार, पवन पवार, गोलू वाळले, राहुल खुपसे, सुभम खुपसे उपस्थित होते.