वाशिम : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी पात्र यूवकांकडून अर्ज मागविण्याला मुदतवाढ दिली असून, आता २५ मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत. २७ मे रोजी चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे.
सुशिक्षित युवकांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी स्पर्धा परिक्षा देऊन शासन दरबारी नोकरी करीत समाजसेवा करायला हवी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व प्रसंग करिअर अॅकेडमी वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने बँक, रेल्वे, एलआयसी व तत्सम लिपिकवर्गीय स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम गेल्या १० वर्षांपासून सुरू असून, पूर्णपणे मोफत असलेल्या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी १२ वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडून २५ मेपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
या प्रशिक्षणासाठी २७ मे रोजी चाचणी परिक्षा होणार असून, उत्तीर्ण उमेदवारांपैकी ३० टक्के महिला, ४ टक्के दिव्यांग आणि ६६ टक्के अशा जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. चाचणी परीक्षेचे ठिकाणउमेदवारांना कळविण्यात येणार आहे. गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवाराला ३ हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन आणि २ हजार रुपये किमतीचा पुस्तक संच देण्यात येणार आहे. या संदर्भात उमेदवार किंवा इच्छुकांना संपर्क साधण्यासह अधिक माहितीसाठी संस्थेने डब्ल्यडब्ल्यूडब्ल्यू डॉट प्रसंग डॉट आॅर्ग डॉट इन हे संकेतस्थळही उपलब्ध केले आहे. इच्छूकांनी विहित मुदतीत प्रसंग करिअर अकॅडमी त्रिवेणी नगर, रेल्वे स्टेशन जवळ, वाशिम येथील कार्यालयात आवेदन पत्र सदर करावे व या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.गजपाल पी. इंगोले व प्रकल्प संचालक संजय इंगोले यांनी केले.