लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: कारंजा शहरातील शिवाजी नगर परिसरातील दोन युवकात जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत एका युवकाच्या पोटात चाकूने वार करून ठार केल्याची घटना १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले व ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, कारंजा शहर पोलिसांनी घटनेच्या दुसर्या दिवशी आरोपीला अटक करून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी मंगेश गजानन काळे (२२) रा. शिवाजीनगर याने सचिन ऊर्फ दत्ता वसंतराव सस्ते (२८) रा. शिवाजीनगर कारंजा याच्या सोबत वाद करून लाथा-बुक्क्याने मारहाण करून चाकूने पोटात वार केले. त्यात सचिन सस्ते याचा जागीच मूत्यू झाला, अशी फिर्याद मृतकाची आई अजनाबाई वसंतराव सस्ते यांनी दिली. फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी आरोपी मंगेश गजानन काळे याच्याविरुद्ध भादंवि ३0२ नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले व ठाणेदार एम.एम. बोडखे करीत आहे.
आरोपीला १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीखून प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक एम.एम. बोडखे यांनी घटनास्थळ गाठले. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांनी आरोपीचा शोध घेण्यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एम.एम. बोडखे, पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन, पोलीस अधिकारी श्रीकांत विखे, कैलास ठोसरे, धनराज पवार, पोलीस कर्मचारी अश्विन जाधव, विनोद राठोड, फिरोज खान यांचे पथक नेमले. या पथकाने आरोपी मंगेश गजानन काळे यास ग्राम शिवनगर शिवारातून सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपीस विद्यमान न्यायालयात हजर केले असता, १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लिलाधर तसरे करीत आहेत.