वाशिम : दिवाळी सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना जिल्ह्यातील शहरांच्या ठिकाणी नियोजित स्थळांवर फटाके विक्रेत्यांची दुकाने थाटण्यास सुरुवात झाली आहे. संभाव्य आपत्तीच्या पृष्ठभूमीवर फटाके विक्रेते व जनतेला दक्षता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून, या दुकांनांवर स्थानिक प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.
दिवाळीच्या सणात फटाके उडविण्याची प्रथा प्राचीन आहे. यासाठी फटाका विक्रीसाठी तात्पुरते परवाने घेऊन अनेक विक्रेते नियोजित ठिकाणी टिनपत्र्याचे स्टॉल उभे करून त्यात ग्राहकांसाठी विविध प्रकारचे आकर्षक फटाके विक्रीसाठी ठेवतात. यंदाही जिल्ह्यात विविध शहरातील विक्रेत्यांचे स्टॉल उभारण्याचे काम पूर्ण होत आले असून, या दुकानांत फटाक्यांच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. फटाका विके्रत्यांना तात्पुरता परवाना घेण्यासंबंधी उपविभागीय अधिकारी कार्यालयात परवानगीचे चलन ज्या जागेत फटाका स्टॉल उभारावयाचे आहे त्या जागेचा नकाशा, पोलिसांचे नाहरकत प्रमाणपत्र, नगरपंचायतचे सुध्दा शिफारसपत्र व त्याबाबतची कागदपत्राची पुर्तता करून आपले फटाक्याचे स्टॉल सुरु करता येते. सद्यस्थितीत नेमक्या किती फटाका विक्रेत्यांनी याची पूर्तता केली हे मात्र कळू शकले नाही.