राष्ट्रपती वीरता पदक मिळविणारे निशांत काकडे हे जिल्ह्यात पहिलेच, तर विदर्भातील दुसरे जवान आहेत.
काश्मीरच्या बारामुल्लाजवळील एका गावात २०१८ मध्ये रात्रीच्या वेळेत काही अतिरेकी एका घरात लपून बसल्याची सूचना सीआरपीएफ जवानांना मिळाल्याने तात्काळ त्यांच्या शोधार्थ सुरक्षा दल, सैन्य दल आणि सीआरपीएफचे एक संयुक्त ऑपरेशन सुरू होते. सफरचंदांच्या बागांचा आडोसा घेऊन ७ अतिरेकी मागच्या पर्वतराजीत पळून जाऊ नये म्हणून थोड्या अंतरावर सीआरपीएफचे चार जवान तैनात होते. या चार जवानांत वाशिमचे निशांत काकडे हेही तैनात होते. घराच्या आडोशाने लपून बसलेल्या ७ अतिरेक्यांनी समोरून येणाऱ्या सैनिकावर अचानक गोळीबार सुरू केला. या गोळीबारात आपल्या सैन्याच्या आघाडीवरील एका जवानास वीरगती प्राप्त झाली. आपल्या सहकाऱ्याला गोळी लागलेली बघून इतर सैनिकांना सुरक्षित आडोसा घ्यावा लागला. सीआरपीएफचे चारही जवान अतिरेकी लपून बसलेल्या घराकडे निघाले. तेवढ्यात लपून बसलेल्या एका अतिरेक्याने अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्यावर गोळ्यांची फैर झाडली. त्या अतिरेक्याला वाटले की त्याच्या गोळीबारात सीआरपीएफचे जवानदेखील मारले गेले असावेत आणि मग त्यांच्या बाजूने पळून जाण्याची ही संधी साधायची म्हणून त्याने खिडकीतून बाहेर अंधारात उडी घेतली. जवानांनी आवाजाच्या दिशेने अचूक गोळ्या झाडल्या. त्यात लष्कर ए तोयबाचा तो अतिरेकी सीआरपीएफ जवानांकडून मारला गेला. दिवस उजाडल्यावर त्या घरात लपून बसलेल्या दुसऱ्या अतिरेक्यालाही जवानांनी अचूक टिपले. या आणीबाणीच्या प्रसंगी दाखविलेल्या कर्तव्यतत्परतेबद्दल भारताच्या महामहीम राष्ट्रपतींकडून सीआरपीएफच्या जवानांना पोलीस मेडल फॉर गॅलेंट्री जाहीर करण्यात आले.
--------------
कोलकाता येथे पुरस्कार प्रदान
कोरोनाच्या नियमांमुळे त्या ऑपरेशनमध्ये कर्तव्यावर असलेले सीआरपीएफचे स्थानिक जवान निशांत काकडे यांना पोलीस वीरता पदक २३ जुलै रोजी कोलकाता येथे प्रदान करण्यात आले. याप्रसंगी त्यांचे ज्येष्ठ बंधू ह.भ.प. नामदेव महाराज काकडे यांची उपस्थिती होती.
वाशिम येथील निशांत काकडे यांची सीआरपीएफतर्फे ७ वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये पोस्टिंग झाली होती. या ७ वर्षांत त्यांनी अतिरेक्यांशी लढताना विविध मोहिमांमध्ये सहभाग घेतला.