शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरल्याने गुरांची संख्या घटली आहे. प्रामुख्याने बैलांचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नसल्याने आता बैलांची संख्या घटली आहे. त्यामुळेच बाजारात बैलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा मानल्या जाणाऱ्या कारंजा येथील बाजारात सोमवारी दमदार बैलजोडीला दीड लाखांच्या वरच दर मिळत असल्याचे दिसून आले. कारंजा येथील गुरांच्या बाजारात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नजीकच्या अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरीही गुरांच्या खरेदीसाठी येतात. त्यामुळे या बाजारात दर सोमवारी लाखोंची उलाढाला केवळ बैलांच्या खरेदी-विक्रीतूनच होत आहे.
---------------------
कोट : गेल्या काही वर्षांपासून चाऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. कडबा मिळणे दुरापास्त असून, कुटाराचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बैलांसाठी पुरेसा चारा असणे आवश्यक आहे. त्यामुळे एकंदर गुरे पाळणे ही समस्याच झाली आहे.
अविनाश भिंगारे,
शेतकरी, जानोरी,
---------------
कोट: चाऱ्याचा मोठ्या प्रमाणात असलेला तुटवडा, तसेच गुरांची देखभाल करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ, या गोष्टी अडचणीच्या ठरत आहेत. वातावरणातील बदलामुळे वाढत असलेल्या आजारांमुळे गुरे पाळणे आता कठीण होऊन बसले आहे.
-रघुनाथ तिडके,
शेतकरी, काजळेश्वर
--------------
कोट: पूर्वी गुरांचा गोठा नाही, असा शेतकरी मिळणे कठीण होते; परंतु गुरांच्या चाऱ्यासह विविध गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. भाकड जनावरांची समस्याही आता गंभीर झाल्याने गुरे पाळण्याचा विचारही करणे अशक्य आहे.
- सुधाकर इंगळे,
शेतकरी, इंझोरी
----------
२० लाखांची उलाढाल
कारंजा येथील गुरांच्या बाजारात वाशिम जिल्ह्यासह अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी गुरांच्या खरेदीसाठी येत असतात. या ठिकाणी गाय, बैल, म्हैस यांच्यासह शेळ्यांची सर्वाधिक खरेदी-विक्री होते. यातून दर आठवड्याला २० लाखांच्यावर उलाढाल होत असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यात बैलांसह म्हशीच्या किमती अधिक असल्याने प्रामुख्याने या दोन वर्गातील गुरांच्या खरेदी-विक्रीतूनच अधिक उलाढाल होत आहे.
---------------
दुधाळ जनावरांची मागणी घटली
१) चाऱ्याची टंचाई आणि संगोपनावरील खर्च यामुळे गुरे पाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दुधाळ जनावरांची मागणी घटली आहे.
२) गायीचे पोषण, देखभाल, चारा आणि आजारांवरील उपचाराचा वाढलेला खर्च पाहता गायी पाळण्याबाबत पशुपालक उदासीन आहेत.
३) एकीकडे गुरांच्या खर्चात वाढ झाली असताना दुधाचे दर मात्र जेमतेम ५० रुपये लिटरपर्यंतच आहेत. त्यामुळेही दुधाळ जनावऱ्यांच्या मागणीत घट झाली आहे.
-------
बैलजोडीवर दिवसाला १५० रुपये खर्च
आधीच चाऱ्याचे दर वाढले असताना बैलांच्या देखभालीसाठी ठेवल्या जाणाऱ्या गड्याची मजुरीही वाढली आहे. त्यामुळे एका बैलजोडीसाठी कडबा, कुटार आणि गड्याच्या मजुरीसह इतर खर्च मिळून शेतकऱ्यांना दीडशे रुपये खर्च येत आहे.