वाशिम : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका सहन करावा लागल्याने ते हताश असताना बाजार व्यवस्थेत मात्र त्यांना दिलासा मिळत आहे. जवळपास सर्वच शेतमालाच्या दरात तेजी असून, तुरीचे दर आता सहा हजारांहून पुढे सरकत साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
वाशिम जिल्ह्यात गत खरीप हंगामापासून नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांचा पिच्छा पुरविला. त्यात अतिवृष्टी, सततचा पाऊस, परतीच्या पावसासह बोंडअळी आणि विविध किडीनंतर ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांवर परिणाम होऊन सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण होते. त्यात सुरुवातीला बाजारातही शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने ते मोठ्याच संकटात सापडले. त्यानंतर मात्र शेतमालांच्या दरात सतत तेजी पाहायला मिळाली. उडीद, मूग, सोयाबीनसह तुरीला शासनाच्या हमीदरापेक्षा अधिक दर मिळत आहेत. उडिद, मुग वगळता सोयाबीन आणि तुरीच्या दरात कमालीची तेजी असून, शासनाच्या हमीदरापेक्षा या दोन्ही शेतमालास ५०० रुपयांपर्यंत अधिक दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळू लागला आहे. जिल्ह्यात गत आठवड्यापर्यंत तुरीच्या दराने ६ हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडला होता तर या आठवड्यात तुरीचे दर ६४०० रुपयांच्या वर पोहोचले आहेत. त्यात मंगरुळपीर येथील बाजार समितीत गुरुवारी प्रतिक्विंटल ६४५० रुपयांचे दर तुरीला मिळाले. मानोरा येथील बाजार समितीत ६३०० रुपये प्रतिक्विंटल, तर वाशिम येथील बाजार समितीतही असेच दर मिळाले. कारंजा येथील बाजार समितीत मात्र तुरीला ६१०० रुपये प्रती क्विंटलचे दर मिळाले.
--------------
दरात आणखी वाढ होणार !
राष्ट्रीय स्तरावरील बाजारात तुरीला वाढती मागणी असल्याने व्यापारी तुरीच्या खरेदीवर अधिक जोर देत आहेत. त्यामुळे तुरीच्या दरात सतत तेजी येत असून, पुढेही हंगामभर असेच चित्र राहून तुरीचे दर अधिक वाढण्याची शक्यता व्यापारीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे. अर्थातच या स्थितीतचा जिल्ह्यातील शेतकºयांना मोठा फायदा होणार आहे.