वाशिम / जऊळका रेल्वे : मालेगाव तालुक्यातील चाकातीर्थ येथे पुजारी म्हणून सेवा देणाऱ्या पती-पत्नीची धारदार शस्त्राने अज्ञात आरोपींनी हत्या केल्याची घटना रविवार, १९ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मालेगाव तालुक्यातच गत १० दिवसांत हत्येची ही दुसरी घटना घडल्याने जिल्हा पुरता हादरून गेला आहे. गजानन निंबाळकर - देशमुख व निर्मला गजानन देशमुख अशी मृत पती - पत्नीचे नाव आहेत.
मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे शेतशिवारात १२ सप्टेंबर रोजी बंदुकीच्या गोळ्या झाडून ३३ वर्षीय युवकाची हत्या झाल्याच्या घटनेची शाई वाळत नाही; तेच मालेगाव तालुक्यातीलच चाकातीर्थ येथील पुजारी दाम्पत्याची हत्या झाली. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या डव्हा तीर्थक्षेत्रापासून जवळच असलेल्या चाकातीर्थ येथे विश्वनाथ बाबांचे समाधीस्थळ, हनुमान मंदिर व राजा बाबाचे समाधी स्थळ आहे. मंदिराची देखभाल, पुजाअर्चा डोंगरकिन्ही येथील गजानन निंबाळकर - देशमुख (६०), निर्मला गजानन देशमुख दाम्पत्य गत वीस वर्षांपासून करीत आहेत. चाकातीर्थ येथे गुण्यागोविंदाने धार्मिक, सामाजिक क्षेत्रात सेवा देणाऱ्या या दाम्पत्याची शनिवारी (दि. १८) रात्री त्यांच्या राहत्या खोलीत पाठीमागून घरात शिरून अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना रविवार, १९ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी घटनास्थळाला भेट दिली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून, श्वान पथकाने मारेकऱ्यांचा डव्हाच्या रस्त्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक कुऱ्हाड आणि हेडफोन जप्त केले. हत्येचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
................
कुऱ्हाड, हेडफोनमुळे तपासाला मिळणार दिशा?
घटनास्थळावर कुऱ्हाड, हेडफोन आढळून आल्याने या घटनेत कुऱ्हाडीचा वापर झाल्याचा दाट संशय वर्तविण्यात येत आहे. पुजारी दाम्पत्याची कुऱ्हाडीने हत्या कोण करणार? नजीकच्या काळात त्यांच्या दाट संपर्कात कोण आले? या अनुषंगाने तपास सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.