लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील चिखली (ता.मंगरूळपीर) येथे प्रस्तावित नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘डिजीटल लाँचिंग’ पद्धतीने केले. यावेळी विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रधानमंत्र्यांनी उत्तरे दिली. शिक्षण, बेरोजगारी, गरीबीच्या मुद्यांवर यावेळी उहापोह झाला. केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान २.० (रुसा) अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील चिखली (ता. मंगरूळपीर) येथे नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली असून त्यासाठी १८ कोटी २५ लाख रुपये अनुदान सुद्धा मंजूर केले आहे. या महाविद्यालयाचा कोनशिला अनावरण समारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम येथे हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना आदिंची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थित मान्यवरांसह शेकडो विद्यार्थ्यांसोबत ‘डिजीटल’ पद्धतीने थेट संवाद साधला. नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालयाच्या फायद्यासोबतच शासनाने राबविलेल्या विविध लोकोपयोगी योजनांबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. यासह विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.
प्रधानमंत्र्यांनी वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 5:30 PM