वाशिम - शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने अंमलात आणलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी थांबविण्यात आली होती; मात्र आता याअंतर्गतच्या कामकाजास गती प्राप्त झाली असून १ लाख १५ हजार पात्र शेतकरी कुटूंबांपैकी पहिल्या हप्त्याच्या रकमेपासून वंचित १ लाख ८ हजार ३०२ शेतकरी कुटूंबांना पहिल्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलात आल्यानंतर जिल्हास्तरावर पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती संकलित करण्याची कार्यवाही ग्राम स्तरावरून सुरू करण्यात आली होती. त्यासाठी तलाठ्यांच्या नेतृत्वात ग्रामसेवक, कृषी सहायक आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सचिवांची समिती स्थापन करून ७ ते १० फेब्रुवारी २०१९ यादरम्यान समित्यांनी गावनिहाय पात्र खातेधारक शेतकऱ्यांची यादी तयार केली. त्या यादीचे १० ते १२ फेब्रुवारीदरम्यान कुटुंबनिहाय वर्गीकरण करण्यात आले. तसेच १५ ते २० फेब्रुवारीदरम्यान पात्र शेतकरी कुटुंबांची यादी त्या-त्या गावांमध्ये प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या. त्यानुसार, पात्र शेतकरी कुटुंबांच्या यादीमध्ये आवश्यक दुरुस्त्या करून अंतिम यादी २० ते २१ फेब्रुवारी दरम्यान त्या-त्या तहसील कार्यालयात प्रसिद्ध करून पात्र काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देय असलेल्या पहिल्या हप्त्याची २ हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली; मात्र १० मार्च २०१९ पासून लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने अन्य योजनांप्रमाणेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचेही काम थांबविण्यात आले होते. यामुळे योजनांतर्गत लाभापासून हजारो पात्र शेतकरी वंचित राहिले. त्या सर्व संबंधितांना आता योजनेचा लाभ दिला जाणार असून थांबलेली मोहीम पुन्हा सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील ६,६९८ शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा
दोन हेक्टरपर्यंत शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. याअंतर्गत तीन टप्प्यात प्रत्येकी २ हजार रुपये याप्रमाणे ६ हजार रुपयांची मदत केली जाणार असून जिल्ह्यातील ६ हजार ६९८ शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात २४ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्हयातील सुमारे १ लाख १५ हजार शेतकरी कुटूंबाना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे.